मुंबई: सध्या देशभरात लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणूकीच्या चार टप्प्यातील मतदान पडलं असून पाचव्या टप्प्यासाठीचं मतदान २० मे रोजी होणार आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांनी कल्याण मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस विकासावर कधीही बोलणार नाही, त्यांना फक्त हिंदू मुसलमान करणं माहीत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.
ते १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी...
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काँग्रेस त्यांचं सरकार असताना खुलेपणानं म्हणायची की देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग बोलले होते, मी त्या मीटिंगला होतो आणि मी विरोध केला होता. काँग्रेसनं विकासाच्या बजेटमध्ये वाटप करण्याचा विचार केला. त्यांनी दोन बजेट केली होती, हिंदू बजेट आणि मुस्लिम बजेट. माझा देश असा चालेल का? बजेटमध्ये १५ टक्के बजेट मुस्लिमांसाठी स्वतंत्रपणे तरतूद करणार होते.. धर्माच्या नावावर त्यांनी देश बनवला, पण अशा बजेटमुळं देशाचं भलं होईल का? हे पाप काँग्रेस करत होतं, याचा मी विरोध केला"
शहजादे तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत...
‘काँग्रेस आणि इंडी आघाडी सत्तेत आली की ते हेच करणार, अशी फूट पाडणं योग्य आहे का? अशा लोकांना संपूर्ण महाराष्ट्रात एकही सीट जिंकू दिली पाहिजे का? पहिल्या चार टप्प्यात लोकांनी इंडी आघाडीला चारी मुंड्या चीत केलं आहे. इंडी आघाडी आणि शहजादे तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. यांचं लक्ष आता बहुजन मतांवर आहे. कर्नाटकात सत्ता येताच यांनी एका रात्रीत हुकूम काढला, ओबीसी मुसलमान आहेत, त्यांचं लक्ष आता ओबीसी आरक्षणावर आहे’, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.
हे व्होट जिहाद करतात...
‘ओबीसी आरक्षणाचे तुकडे तुकडे करून ते कुणाला देणार? मुसलमान मत देतात त्यांना हे आरक्षण देणार. हे व्होट जिहाद करतात. याचा इंडी आघाडीतील कुणी विरोध केला का? मी विरोध केला तर म्हणतात मोदी हिंदू-मुसलमान करतात, पण मी शांत बसणार नाही. मला माझ्या छबीपेक्षा हिंदुस्तानची छबी जास्त प्रिय आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.