
नवी दिल्ली : महाकुंभच्या मुद्द्यावर आपल्यालाही संसदेत बोलावयाचे होते. प्रयागराजमध्ये महाकुंभदरम्यान चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये प्राण गमवावे लागलेल्यांना मोदी यांनी श्रद्धांजली वाहणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे केले नाही, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महाकुंभबाबत निवेदन केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या निषेधामुळे सभागृहाचे कामकाज अल्पावधीसाठी तहकूब करावे लागले. ‘लोकशाही संरचनेत विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची परवानगी द्यावयास हवी होती, मात्र नव्या भारतामध्ये ही परवानगी देण्यात आली नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान सभागृहात बोलणार होते, त्याची माहिती वेळेत दिली गेली नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला. या संपूर्ण मुद्द्यावर विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, हा कसला नवीन भारत, मोदींनी देशातील बेरोजगारीबाबतही बोलायला हवे होते, मात्र ते यावर काहीही बोलले नाहीत. मोदींनी महाकुंभमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहायला हवी होती, पण त्यांनी तसे केले नाही, अशी टीका त्यांनी केली.
कुंभ ही आपली परंपरा, इतिहास, संस्कृती!
संसद संकुलात पत्रकारांना राहुल गांधी यांनी सांगितले की, कुंभ ही आपली परंपरा, इतिहास, संस्कृती आहे. पण कुंभमध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्याबद्दल मोदी काहीही बोलले नाही, अशी आमची तक्रार आहे. कुंभला जाणाऱ्या तरुणांना पंतप्रधानांकडून रोजगार हवा आहे, पण पंतप्रधानांनी रोजगाराबाबत एक चकार शब्दही काढला नाही, असे ते म्हणाले.
मृत्यू, जखमींची नोंद नाही - राय
प्रयागराज येथे अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले याच्या आकडेवारीची नोंद केंद्र सरकारने ठेवलेली नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात म्हटले आहे. सर्वसामान्य जनजीवन आणि पोलीस हा घटनेच्या सातव्या परिशिष्टानुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे, असेही राय यांनी स्पष्ट केले.
सामूहिक जाणीव हीच ताकद - मोदी
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संसदेत महाकुंभाच्या आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी लाल किल्ल्यावरुन सर्वांच्या प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले होते. संपूर्ण जगाने महाकुंभाच्या रुपाने भारताची भव्यता पाहिली. हे सर्वांच्या प्रयत्नांचे खरे यश आहे. गेल्या वर्षी अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देश हजार वर्षांसाठी कसा तयार होत आहे, याची जाणीव झाली होती. बरोबर एक वर्षानंतर महाकुंभाने आपल्या सर्वांच्या या विचाराला आणखी बळ दिले. देशाची ही सामूहिक जाणीव देशाची ताकद दाखवते, असे मोदी यावेळी म्हणाले.