

नवी दिल्ली : १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान, एकमेकांप्रति संवेदनशीलता व एकमेकांचे हितसंबंध जपणे आदी तीन मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, असेही मोदी यांनी चीनला सांगितले.
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दाखल झाल्यानंतर काही तासांतच षी व मोदींची भेट झाली.
या बैठकीबाबत माहिती देताना परराष्ट्र खात्याचे सचिव सुधाकर दलेला म्हणाले की, व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांचा विस्तार करून द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय बैठकीत ऑगस्ट २०२५ मध्ये तियानजिन येथे झालेल्या मागील भेटीनंतर भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी जनतेतील परस्पर संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची दखल घेतली. तसेच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यावसायिक संबंध आणि नागरिकांची ये-जा अधिक वाढविण्याची गरज अधोरेखित केली.
आर्थिक आणि व्यापारी संबंधांबाबत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या चिंता दूर करण्याच्या गरजेवर भर दिला. यामध्ये संरचनात्मक व्यापार असमतोल आणि पुरवठा साखळीशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच अर्थपूर्ण आणि अंदाजे स्वरूपातील बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहमतीच्या क्षेत्रांचा विस्तार सुरू ठेवावा, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी चीनने दिलेल्या पाठिंब्याचे तसेच २०२६ मधील ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.
या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सीमावादाच्या तोडग्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. सीमावर्ती भागात शांतता व स्थिरता गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.