
सोनमर्ग : तुम्हाला मोदींवर विश्वास ठेवावा लागेल, मोदी जे बोलतात ते करतात. योग्य वेळी योग्य गोष्टी होतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना टोला लगावला. जम्मू-काश्मीरला घटक राज्याचा दर्जा देण्याची मागणी अब्दुल्ला यांनी केली होती, त्यावर मोदी यांनी त्यांना तिरकसपणे उत्तर दिले.
काश्मीर आणि सोनमर्ग यांना जोडणाऱ्या ६.४ किमी अंतराच्या बोगद्याचे मोदी यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित एका सभेत पंतप्रधान बोलत होते. सदर बोगदा २७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. जाहीरसभेत अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला घटक राज्याचा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली आणि मोदी तुम्ही हे आश्वासन पूर्ण कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मात्र, अब्दुल्ला यांच्या मागणीचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले की, तुम्हाला मोदींवर विश्वास ठेवावा लागेल, मोदी जे बोलतात ते करतात, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते आणि योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. मोदी यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या गंडेरबल जिल्ह्यात झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये या बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
बोगद्याच्या उद्घाटनानंतर श्रीनगर-सोनमर्ग मार्गावरील रस्त्याचा भाग सर्व ऋतूंसाठी खुला राहील आणि सोनमर्ग प्रदेशातील हिवाळी पर्यटनालाही चालना मिळेल. श्रीनगर-लेह महामार्ग नॅशनल हायवे एकवर बांधलेला हा ६.४ किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल. बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग ६ महिने बंद असतो. बोगद्याच्या बांधकामामुळे लोकांना सर्व प्रकारच्या वातावरणात इथून प्रवास करता येणार आहे. या बोगद्यामुळे आता हे अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे.
आता येथे वाहनांचा वेगही ३० किमी/तासवरून ७० किमी/तास होईल. पूर्वी हा दुर्गम डोंगराळ भाग पार करण्यासाठी ३ ते ४ तास लागत होते. आता हे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत कापले जाणार आहे. पर्यटनाबरोबरच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या बोगद्यामुळे लष्कराला लडाखपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. बर्फवृष्टीदरम्यान लष्कराला हवाई दलाच्या विमानांमध्ये जे सामान वाहून न्यावे लागत होते, ते आता कमी खर्चात रस्त्याने पोहचवता येणार आहे. हा बोगदा ४३४ किमी लांबीच्या श्रीनगर-कारगिल-लेह महामार्ग प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत ३१ बोगदे बांधले जात आहेत, त्यापैकी २० जम्मू-काश्मीरमध्ये आणि ११ लडाखमध्ये आहेत.
सोनमर्ग बोगद्याची वैशिष्ट्ये
हा ६.४ किमी लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमर्गशी जोडेल.
या बोगद्यासाठी २,७०० कोटी रुपये खर्च
लष्कराला लडाखपर्यंत पोहोचणे सुलभ होणार
३-४ तासाचे अंतर ४५ मिनिटात गाठता येणार.
श्रीनगर-सोनमर्ग मार्गावरील रस्त्याचा भाग सर्व ऋतूंसाठी खुला राहील.