अदिस अबाबा : इथिओपिया ही सिंहांची भूमी आहे, माझे गृहराज्य गुजरात हीसुद्धा सिंहांची भूमी आहे, त्यामुळे आपल्या येथे येऊन खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. दरम्यान, 'द ग्रेट ऑनर निशाण ऑफ इथिओपिया' हा सर्वोच्च सन्मानही यावेळी मोदी यांना इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर सन्मान मिळविणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. हा सन्मान आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले. मोदी मंगळवारीच इथिओपियामध्ये पोहोचले होते. हा त्यांचा पहिला दौरा आहे. अबी अहमद अली यांनी नॅशनल पॅलेसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. मोदी यांचे भाषण संपताच खासदारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
४० लाख कोविड लसी
मोदी म्हणाले, कोविड-१९ दरम्यान भारताने १५० हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लसी पाठवल्या. इथिओपियाला ४० लाखांहून अधिक लसीचे डोस पुरवणे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती. भारतात आम्ही स्वतःची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केली आहे. यामुळे सरकारी सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. आज, भारतातील जवळजवळ प्रत्येकजण पेमेंट, ओळख आणि सरकारी सेवांसाठी डिजिटल पद्धती वापरतो. जगातील अर्ध्याहून अधिक डिजिटल पेमेंट भारतात केले जातात, असेही पंतप्रधान म्हणाले