

हरदोई/लखनौ : उत्तर प्रदेशमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मेरठ ते प्रयागराज दरम्यानच्या ५९४ किलोमीटर लांबीच्या ‘गंगा एक्सप्रेसवे’चे लोकार्पण केले. हरदोई जिल्ह्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात रिमोटचे बटण दाबून पंतप्रधानांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा हाय-स्पीड कॉरिडॉर राज्यातील दळणवळण सुलभ करण्यासोबतच औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक आणि कृषी मार्केटिंगला मोठी गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकासाची नवी ‘लाईफलाईन’
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, गंगा एक्सप्रेसवेमुळे उत्तर प्रदेशच्या विकास प्रवासाला नवी गती मिळेल. ६ पदरी (८ पदरांपर्यंत विस्तारण्यायोग्य) असलेला हा एक्सप्रेसवे खेडी, शेतकरी, उद्योजक आणि तरुणांना जोडणारी 'लाईफलाईन' ठरेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी या प्रकल्पाचे वर्णन 'राज्याला मिळालेली आधुनिक पायाभूत सुविधांची भेट' असे केले आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
हा एक्सप्रेसवे मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदाऊन, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या १२ जिल्ह्यांना जोडतो. ताशी १२० किमी वेगाने प्रवास करण्यायोग्य डिझाइन असलेल्या या मार्गावर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन कॉल बॉक्सची सुविधा आहे. शाहजहानपूरजवळ ३.२ किमी लांबीची धावपट्टी तयार करण्यात आली आहे, ज्याचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी करता येईल. एक्सप्रेसवेच्या कडेला एकात्मिक उत्पादन आणि लॉजिस्टिक क्लस्टर्स, शीतगृहे आणि फूड प्रोसेसिंग हब विकसित केले जात आहेत, ज्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
हा एक्सप्रेसवे पूर्वांचल, आग्रा-लखनौ आणि बुंदेलखंड एक्सप्रेसवेला जोडला गेल्याने राज्यात एक मोठे रस्ते जाळे तयार झाले आहे. उत्तर प्रदेशला 'ट्रिलियन डॉलर' अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.