जी-७ परिषदेत घुमेल भारताचा आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

आगामी 'जी- ७' शिखर परिषदेत भारत केवळ स्वतःचीच बाजू मांडणार नाही, तर विकसनशील आणि गरीब देशांच्या म्हणजेच 'ग्लोबल साऊथ'च्या आशा-आकांक्षांना जागतिक व्यासपीठावर वाचा फोडेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्पष्ट केले.
जी-७ परिषदेत घुमेल भारताचा आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
जी-७ परिषदेत घुमेल भारताचा आवाज : पंतप्रधान नरेंद्र मोदी(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली: आगामी 'जी- ७' शिखर परिषदेत भारत केवळ स्वतःचीच बाजू मांडणार नाही, तर विकसनशील आणि गरीब देशांच्या म्हणजेच 'ग्लोबल साऊथ'च्या आशा-आकांक्षांना जागतिक व्यासपीठावर वाचा फोडेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी हे फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात त्यांनी, जी-७ परिषदेतील भारताची उपस्थिती ही जागतिक पातळीवरील भारताची वाढती पत आणि भागीदार देशांचा भारतावरील विश्वास दर्शवणारी आहे, असे सांगितले. भारताला 'जी-७' शिखर परिषदेसाठी सलग आठव्यांदा आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत भारत केवळ स्वतःचे प्रतिनिधित्व करणार नाही, तर संपूर्ण 'ग्लोबल साउथ'चा आवाज बनेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यंदाची जी-७ शिखर परिषद १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समधील 'एव्हियन' येथे आयोजित करण्यात आली आहे. आपल्या या दौऱ्याबद्दल पंतप्रधान म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की, फ्रान्स आणि स्लोव्हाकिया प्रजासत्ताकचा माझा हा दौरा युरोप आणि जी-७देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक दृढ करेल. तसेच युरोपीय खंडासोबत आमची भागीदारी विस्तारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला गती देईल. भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून फ्रान्सला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तर दुसरीकडे, १९९३ मध्ये स्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्यानंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ऐतिहासिक दौरा असून, यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

'भारत इनोव्हेट्स'

पंतप्रधान मोदी १४ जून रोजी फ्रान्समधील 'निस' येथे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत 'भारत इनोव्हेट्स' या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. 'भारत-फ्रान्स नाविन्यता वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम भारताचे आघाडीचे स्टार्टअप्स आणि जागतिक गुंतवणूकदार यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल. यानंतर, १४ ते १५ जून दरम्यान पंतप्रधान स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असतील. तेथे ते राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आणि पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि उद्योजकांशी संवाद साधतील. भारत आणि युरोपीय संघामधील मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विव्हाटेक २०२६

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, १८ जून रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या युरोपमधील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान परिषद म्हणजेच 'विव्हाटेक २०२६' मध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन एकत्र सहभागी होतील. यंदा या परिषदेत भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय पॅव्हेलियन असेल. शेवटी, पॅरिसमधील भारतीय समुदायाशी संवाद साधून पंतप्रधान आपल्या दौऱ्याचा समारोप करतील.

logo
marathi.freepressjournal.in