नरेंद्र मोदी जन्मतःओबीसी नाहीत! राहुल गांधी यांचा दावा

देशात गेल्या ४० वर्षांत सर्वाधिक बेरोजगारीचा दर आहे. महागाई वाढत आहे, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण होत आहे.
नरेंद्र मोदी जन्मतःओबीसी नाहीत! राहुल गांधी यांचा दावा

रायगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्मतः ओबीसी नाहीत. त्यांची जात ‘घांची’. २००० मध्ये गुजरातमधील तत्कालीन भाजप सरकारने इतर मागासवर्गीय यादीत समाविष्ट केली होती, असा दावा करीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अन्यायाला प्रोत्साहन देणे व द्वेष आणि हिंसाचार पसरवणे असा सत्ताधारी भाजपचा दोन कलमी कार्यक्रम आहे, असा आरोपही राहुल यांनी गुरुवारी केला.

छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील रेंगालपाली गावात गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' ओदिशातून दाखल झाल्यानंतर ते एका जाहीर सभेत बोलत होते. नोव्हेंबर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गांधी यांचा छत्तीसगडचा हा पहिलाच दौरा होता, ज्यामध्ये त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतून बाहेर पडला होता. वर्षापूर्वी त्यांच्या भारत जोडो यात्रेने कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान भाजपच्या द्वेष पसरवण्याच्या आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण करण्याच्या कृतीच्या विरोधात सुमारे ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला. आता जनतेला न्याय मिळावा, यासाठी भारत जोडो न्याय यात्रा सुरू करण्यात आल्याचे गांधी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेतून ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ अशी घोषणा तयार झाली होती. ती काँग्रेसची विचारधारा स्पष्ट करते. ‘ते द्वेषाचे बाजार उघडतात आणि आम्ही प्रेमाचे दुकान उघडतो. ते हिंसेचे बाजार चालवतात, आम्ही अहिंसेचे दुकान चालवतो,’ असा दावा गांधी यांनी केला. ते म्हणाले की, लोकांच्या मागणीनुसार आम्ही यात्रेची दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यात 'न्याय' शब्द जोडला.

देशात गेल्या ४० वर्षांत सर्वाधिक बेरोजगारीचा दर आहे. महागाई वाढत आहे, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण होत आहे. आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत आणि लोकांवर आर्थिक अन्याय होत आहे, असा दावाही माजी काँग्रेस अध्यक्षांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in