फाळणीच्या बळींचे मोदींनी केले स्मरण

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी १९४७मधील फाळणीच्या भयानक वेदना सहन करणाऱ्या आणि प्राण गमावणाऱ्या पीडितांचे स्मरण केले.
फाळणीच्या बळींचे मोदींनी केले स्मरण
Published on

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी १९४७मधील फाळणीच्या भयानक वेदना सहन करणाऱ्या आणि प्राण गमावणाऱ्या पीडितांचे स्मरण केले. भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या दंगली आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या विस्थापनात जीव गमावलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोदी सरकारने २०२१ पासून १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळण्यास सुरुवात केली आहे.

मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत लिहिले की, आज आपण 'फाळणी वेदना स्मृती दिन' पाळत आहोत. फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्व लोकांच्या धैर्याचे आज आपण स्मरण करतो. हा इतिहासातील असा एक क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे उध्वस्त झाली, प्रियजनांना गमवावे लागले आणि अफाट हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही लोकांनी शून्यातून पुन्हा आपले विश्व निर्माण केले. संकटांवर मात करत त्यांनी यश संपादन केले आणि देशाच्या प्रगतीत बहुमूल्य योगदान दिले. त्यांचे जीवन आपल्या सर्वांना मानवी धैर्याची आणि मानसिक ताकदीची आठवण करून देते, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

देशातील बंधुभाव आणि एकता अधिक मजबूत करण्याचे आवाहन करत पंतप्रधान म्हणाले, हा दिवस आपल्या देशातील सौहार्द आणि बंधुता जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देवो. चला, आपण सर्व मिळून राष्ट्रभावना, सलोखा आणि एकता अधिक बळकट करूया.

शहा यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १४ ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त देशवासीयांशी संवाद साधताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. शहा म्हणाले की, १४ ऑगस्ट हा दिवस इतिहासातील अत्यंत क्रूर प्रकरणांपैकी एक आहे आणि देशाच्या फाळणीची ही जखम, जी काँग्रेसचीच देन आहे, इतिहास कधीही विसरू शकणार नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in