नेहरूंमुळे जम्मू-काश्मीरचे विभाजन! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात; सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

काँग्रेसच्या चुकीमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेला, काँग्रेसने वेगळे संविधान तयार करून काश्मीरला देशापासून वेगळे केले, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.
नेहरूंमुळे जम्मू-काश्मीरचे विभाजन! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात; सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली
Photo : X (Narendra Modi)
Published on

एकतानगर (गुजरात) : काँग्रेसच्या चुकीमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेला, काँग्रेसने वेगळे संविधान तयार करून काश्मीरला देशापासून वेगळे केले, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.

गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. राष्ट्रीय एकतादिनाच्या निमित्ताने त्यांनी जमलेल्या लोकांसोबत एकतेची शपथही घेतली. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी पाकिस्तानवर टीकास्र सोडतानाच काँग्रेसलाही लक्ष्य केले.

सुरक्षा धोक्यात घातली

सरदार पटेल जसे इतर संस्थानांचे विलिनीकरण करण्यात यशस्वी झाले, तसेच काश्मीरचे पूर्ण विलिनीकरण व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण नेहरूंनी ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. काँग्रेसने काश्मीरला स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र झेंडा देऊन देशापासून वेगळे केले. त्या चुकीच्या निर्णयाची आग देशाने अनेक दशके भोगली. देशाच्या एकतेला आणि अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका हा घुसखोरांकडून आहे. अनेक दशकांपासून परदेशी घुसखोर देशात येत राहिले, त्यांनी संसाधनांवर कब्जा केला, लोकसंख्येचे संतुलन बिघडवले आणि देशाच्या एकतेवर परिणाम केला. पण पूर्वीच्या सरकारांनी या समस्येकडे डोळेझाक केली. मतांच्या राजकारणासाठी त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेला धोक्यात घातले, अशी घणाघाती टीकाही मोदींनी यावेळी केली.

भारताचे प्रत्युत्तर ठोस

मोदी पुढे म्हणाले, सरदार पटेल यांना इतिहास लिहिण्यात वेळ घालवायचा नव्हता, ते इतिहास घडविण्यात विश्वास ठेवायचे. त्यांनी देशाच्या एकतेसाठी जे कार्य केले ते अद्वितीय आहे. आज कश्मीर अनुच्छेद ३७० च्या बेड्यांतून मुक्त होऊन मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला दाखवून दिले की, भारतावर नजर टाकणाऱ्याला भारत आता घरात घुसून मारतो. प्रत्येकवेळी भारताचे प्रत्युत्तर अधिक ठोस आणि निर्णायक असते.

पटेलांच्या विचारांचे विस्मरण

दरम्यान, यावेळी मोदींनी काँग्रेसवर सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार विसरल्याचा आरोप केला. सरदार पटेल यांचे आदर्श विचार शासन कारभाराबाबत अनेक बाबतीत मार्गदर्शन करतात. त्यात फक्त बाह्य शत्रूंविरोधातील सरकारची भूमिकाच नव्हे, तर नक्षलवाद आणि घुसखोरीसारख्या अंतर्गत शत्रूंचा सामना करण्याबाबतचेही विचार आहेत, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in