घुसखोरी हे पश्चिम बंगालसमोरील सर्वात मोठे आव्हान - पंतप्रधान

पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घुसखोरीचा आधार घेतला. राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदेशी स्थलांतरामुळे राज्याच्या लोकसंख्येत बदल झाला, दंगली उसळल्या आणि सत्तारूढ पक्षाने आश्रय दिल्याने त्याचे प्रमाण वाढत गेले, असे आरोप मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

माल्दा : पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घुसखोरीचा आधार घेतला. राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदेशी स्थलांतरामुळे राज्याच्या लोकसंख्येत बदल झाला, दंगली उसळल्या आणि सत्तारूढ पक्षाने आश्रय दिल्याने त्याचे प्रमाण वाढत गेले, असे आरोप मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर केले.

मतदार याद्यांबाबतच्या 'एसआयआर' मोहिमेवरून राजकीय वाद उफाळून आलेला असतानाच मोदी यांनी मातुआसारख्या निर्वासितांना आश्वस्त केले. शेजारच्या बांगलादेशात धर्मावरून छळ सहन करावा लागलेल्यांनी भारतात स्थलांतर केले त्यांनी भीती बाळगू नये, असे मोदी म्हणाले.

बेकायदेशीर स्थलांतर थांबविणार

मुस्लिमबहुल जिल्ह्यातील सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, घुसखोरीमुळे बंगालसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. विकसित देशही बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध ठोस कारवाई करीत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यास घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई करून बंगालमधील बेकायदेशीर स्थलांतर थांबविले जाईल, असे मोदी म्हणाले.

लोकसंख्या संतुलन बिघडले

घुसखोरांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असून त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये लोकसंख्येचे संतुलन बिघडले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी बोलीभाषाही बदलू लागल्याचे आपल्याला अनेकांनी सांगितले. घुसखोरांमुळे लोकसंख्या वाढली आणि त्यामुळे माल्दा आणि मुर्शिदाबादसह अनेक ठिकाणी दंगली सुरू झाल्या, असा आरोपही मोदी यांनी केला.

ममता सरकारवर टीका

पश्चिम बंगालमधील काही दिवसापूर्वी झालेल्या घडामोडींवरून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, हे निर्दयी तृणमूल काँग्रेस सरकार सार्वजनिक निधीची लूट करत आहे. केंद्र सरकारच्या योजना बंगालच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारे हे राज्य सरकार आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेत आला तरच बंगालचा विकास होऊ शकेल.

विकासाला प्राधान्यक्रम

पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ओदिशा, त्रिपुरा, आसाम आणि बिहारमध्येही भाजपची सरकारे आहेत. आता बंगालमध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले पाहिजे. पश्चिम बंगालचा जलद विकास हा भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम आहे. देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर ट्रेन' बंगालमधून सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

तरुणांचे योगदान

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरुण पिढीच्या योगदानाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतातील लोक भाजपच्या विकास मॉडेलवर विश्वास ठेवतात. ज्याप्रमाणे मुंबईत भाजपला विक्रमी विजय मिळाला, त्याचप्रमाणे बंगालचे मतदार यावेळी भाजपला निवडून देतील, असेही मोदी म्हणाले.

'वंदे भारत स्लीपर ट्रेन'ला मोदींनी दाखविला हिरवा झेंडा

माल्दा शहरातून हावडा आणि गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर' गाडीला मोदी यांनी शनिवारी हिरवा झेंडा दाखविला. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासाच्या गुवाहाटी-हावडा गाडीलाही त्यांनी आभासी पद्धतीने झेंडा दाखविला. या गाडीत मोदींनी लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

३,२५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पश्चिम बंगाल आणि उत्तर-पूर्वेकडील संपर्कतावाढ आणि विकासकामांना चालना देण्याचा उद्देश असलेल्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांसाठीच्या ३,२५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही मोदी यांनी उद्घाटन केले. त्याचप्रमाणे मोदी यांनी न्यू जलपैगुडी-नागरकॉईल-तिरुचिरापल्ली आणि अलीपुरदुआर-एमएमव्हीटी बंगळुरू आणि मुंबई (पनवेल) यांना जोडणाऱ्या 'अमृत भारत' गाड्यांना आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला.

logo
marathi.freepressjournal.in