महाराष्ट्रात मोदी, शहांच्या प्रचारसभा ठरल्या; मोदींची १० एप्रिलला रामटेकला सभा

येत्या १० एप्रिलला नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे. तर अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात पहिली सभा होणार आहे.
महाराष्ट्रात मोदी, शहांच्या प्रचारसभा ठरल्या; मोदींची १० एप्रिलला रामटेकला सभा

प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होत असल्याने येथे भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १० एप्रिलला नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन आणि चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे. तर अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात पहिली सभा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर बोलताना दरेकर म्हणाले, “महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडली. महाराष्ट्रात निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना काय आहे, कशाप्रकारची व्यवस्था, यंत्रणा उभी आहे. या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होते आहे, याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉ. दिनेश शर्मा यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रत्येकावर जबाबदारी देण्यात आली आहे.”

दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, “निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक जण इच्छुक असतात. काही जण उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करतात आणि एखाद्याला निवडणूक लढवायची असेल तर अशाप्रकारची भूमिका अनेक लोक वेगळ्या पक्षात जाताना दिसतात. तशी भूमिक उन्मेश पाटील यांची आहे का? हे लवकरच समजेल. ठाकरेंना दुसऱ्यांनी टाकलेले उचलावे लागणार आहे. स्वत:कडे उमेदवार नाहीत.”

logo
marathi.freepressjournal.in