

नवी दिल्ली : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. तसेच महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, आदिवासी उद्योजकता, वस्त्रकला, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृती यांची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संचही सादर केला. ध्वजारोहणाच्या दिवशी होणाऱ्या गोदा आरतीसह नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि कुंभमेळ्यावरील टपाल तिकिटाच्या अनावरणासाठीही राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले.
या वेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पुरोहित संघांचे पदाधिकारी आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
भेटवस्तू संचात शबरी नॅचरल्सची अगरबत्ती, भरडधान्यांपासून तयार केलेले पदार्थ, मोहफुलांची उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यांचा समावेश आहे. येवला येथील पैठणी, काळ्या मनुका, काजू, नाशिकचा चिवडा, मिठाई आणि सुकामेवा यांचाही या संचात समावेश असून, त्यातून महाराष्ट्राची हस्तकला, कृषिसमृद्धी, खाद्यसंस्कृती आणि आदिवासी उद्योजकतेचे दर्शन घडते.
निमंत्रणातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण कलात्मक संकल्पनेवर आधारित असून, पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक पार्श्वभूमी, आध्यात्मिक महात्म्य आणि भव्यता दर्शविणारी त्रिमितीय कलाकृती उलगडते. दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांशी संबंधित अनुभवांतून नाशिकचा सांस्कृतिक वारसा आणि गोदावरीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.