राष्ट्रीय आरोग्य निधी : गरीब गरजू रुग्णांसाठी वरदान; केंद्राची १५ लाखांपर्यंत आर्थिक मदत

कर्करोग, हृदयविकार, किडनी व यकृत विकार, न्यूरो-सर्जरी, हाडांचे आजार, दुर्मिळ आजार अशा जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी केंद्र शासनाने गरीब गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
राष्ट्रीय आरोग्य निधी : गरीब गरजू रुग्णांसाठी वरदान; केंद्राची १५ लाखांपर्यंत आर्थिक मदत
Published on

मुंबई : कर्करोग, हृदयविकार, किडनी व यकृत विकार, न्यूरो-सर्जरी, हाडांचे आजार, दुर्मिळ आजार अशा जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी केंद्र शासनाने गरीब गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य निधी’ या योजनेंतर्गत १५ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत गरीब, गरजू रुग्णांना सरकारी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत उपचार घेणे शक्य झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. कर्करोग, हृदयविकार, किडनी व यकृत विकार, न्यूरो-सर्जरी, हाडांचे आजार, दुर्मिळ आजार अशा विविध आजारांनी लोकांना ग्रासले आहे. या आजारांवरील उपचार महागडे असल्याने गरीब गरजू रुग्णांना परवडणारे नाहीत. त्यामुळे गरीब गरजू रुग्णांच्या सृदृढ आरोग्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रीय आरोग्य निधी या छत्र योजनेत राष्ट्रीय आरोग्य निधी, आरोग्य मंत्री कर्करोग रुग्ण निधी आणि विशिष्ट दुर्मिळ आजार याचा समावेश करण्यात आला असून ग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना अंमलात आणली आहे.

अधिक माहितीसाठी आरोग्य हेल्पलाईन १०४/१०७५ किंवा https://main.mohfw.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. राज्यातील पात्र नागरिकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

या योजनेसाठी अटी शर्ती व पात्रता निश्चित

  • रुग्ण दारिद्र्य रेषेखालील(बीपीएल) असावा. उत्पन्न मर्यादा राज्यनिहाय निश्चित करण्यात आली आहे.

  • लाभार्थी शासकीय कर्मचारी किंवा पेंशनधारक नसावा.

  • प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी (आयुष्मान भारत) आरएएनअंतर्गत पात्र ठरत नाहीत.

  • उपचार फक्त सरकारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात झाले पाहिजेत.

  • कमाल आर्थिक मदत १५ लाखांपर्यंत काही शासकीय रुग्णालयांमध्ये रिव्हाल्विग फंड उपलब्ध असून त्वरित ५ लाखांपर्यंत मदत मिळते.

या रुग्णांना मिळणार लाभ

या योजनेचा लाभ राष्ट्रीय आरोग्य निधी (आरएएन) अंतर्गत समाविष्ट असलेल्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना मिळतो. मात्र, हे उपचार विनामूल्य उपलब्ध नसतील तरच मदत दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना या योजनेतून दिलासा मिळतो.

या आजारांसाठी आर्थिक मदत

  • कर्करोग (कॅन्सर)

  • हृदयविकार

  • मूत्रपिंड/यकृत निकामी होणे

  • मेंदू व मज्जासंस्थेचे आजार

  • थॅलेसेमिया व इतर रक्ताचे आजार

इतर जीवघेणे आजार (डॉक्टरच्या सल्ल्यानुसार)

logo
marathi.freepressjournal.in