

फरीदाबाद : राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक अंकुश भारद्वाजविरोधात राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असलेल्या अल्पवयीन युवतीने (वय-१७) लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला असून याप्रकरणी हरयाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित खेळाडूच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मंगळवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आरोपी अंकुश भारद्वाज हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) कडील १३ राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षकांपैकी एक आहेत. आरोप समोर आल्यानंतर त्यांना NRAI ने तात्काळ निलंबित केले आहे.
आधी हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटायला बोलावले, नंतर...
ही घटना नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेदरम्यान घडली. स्पर्धेदरम्यान कामगिरीचे मूल्यांकन करण्याच्या बहाण्याने भारद्वाजने पीडित मुलीला फरीदाबादमधील एका हॉटेलच्या खोलीत बोलावले आणि अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सुरुवातीला खेळाडूला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्यास सांगण्यात आले होते. मात्र नंतर कामगिरीचे मूल्यमापन करण्याच्या बहाण्याने तिला खोलीत जाण्यास दबाव टाकण्यात आला.
करिअर बरबाद करण्याची धमकी
तसेच, या घटनेची कुणाला माहिती दिल्यास तिचे करिअर उद्ध्वस्त करू आणि कुटुंबाला इजा पोहोचवू, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. धक्क्यातून सावरत खेळाडू हॉटेलमधून बाहेर पडली आणि नंतर तिने कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फूटेज मागवले
अल्पवयीन मुलीच्या आरोपांची सत्यता पडताळली जात आहे. त्यासाठी घटनेच्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्याचे आदेश हॉटेल प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे फरीदाबाद पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी यशपाल यादव यांनी सांगितले. महिला पोलिस ठाणे, एनआयटी फरीदाबाद येथे आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ६ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे अंकुश भारद्वाज?
अंकुश भारद्वाजने २००८ च्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत ५० मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. दोन वर्षांनंतर, बीटा ब्लॉकर्ससाठी त्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्याच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाबद्दल बंदी घातली. त्यावेळी अंकुशने सांगितले होते की, त्याने हलक्या डोकेदुखीसाठी औषध घेतले होते आणि त्याचा चाचणीच्या निकालावर काय परिणाम होईल याची त्याला कल्पना नव्हती. त्याने २०१२ मध्ये पुनरागमन केले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली. भारद्वाज सध्या मोहालीमध्ये राहतो आणि सेक्टर ८६ मध्ये 'साल्वो शूटिंग रेंज' चालवतो. या शूटिंग अकादमीच्या अनेक शाखा आहेत. भारद्वाज हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने नियुक्त केलेल्या १३ राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षकांपैकी एक आहेत. त्याचे लग्न दोन वेळा ऑलिम्पियन राहिलेल्या अंजुम मौदगिलशी झाले आहे. आरोप समोर आल्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. NRAI चे सचिव जनरल पवन कुमार सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, “ही माहिती आम्हाला माध्यमांमधून मिळाली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रशिक्षक अंकुश यांना सर्व जबाबदाऱ्यांवरून निलंबित करण्यात आले असून कोणतीही नवी जबाबदारी देण्यात येणार नाही.” तक्रारीनुसार, याच प्रशिक्षकाकडून यापूर्वीही आणखी एका महिला नेमबाजेला अशाच प्रकारचा अनुभव आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.