रायपूर : गेल्या ११ वर्षांत नक्षली जिल्ह्यांची संख्या १२५ वरून केवळ तीनवर आली आहे. देश नक्षलवादाच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त होण्याचा दिवस आता दूर नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
नवा रायपूर येथे छत्तीसगढ स्थापनेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात 'छत्तीसगढ रजत महोत्सव' प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी बोलत होते. मोदी यांच्या हस्ते राज्यातील रस्ते, उद्योग, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रातील १४,२६० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. नवा रायपूर येथे त्यांनी छत्तीसगढ विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले आणि माजी पंतप्रधान भारत लवकरच नक्षलमुक्त होणार अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
मोदी म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी रोवलेले 'बी' आता विकासाच्या 'वटवृक्षात' परिवर्तित झाले आहे. पाच दशकांपासून नक्षल हिंसेमुळे त्रस्त असलेल्या छत्तीसगढ राज्याला आता त्या विळख्यातून मुक्त होताना पाहून त्यांना समाधान मिळते.
५० वर्षे येथील जनतेने नक्षलवादामुळे असह्य वेदना सोसल्या. जे राज्यघटनेची नुसती माळ घालतात आणि सामाजिक न्यायाच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळतात, त्यांनीच स्वार्थासाठी तुमच्यावर अन्याय केला, अशी टीका त्यांनी केली.
'नक्षल विचारसरणीमुळे आदिवासी भागांना मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्या. वर्षानुवर्षे आदिवासी खेड्यांत रस्ते, शाळा, रुग्णालये नव्हती. जी होती ती बॉम्बने उडवली जात. डॉक्टर, शिक्षक मारले जात. दशकानुदशके सत्तेत राहिलेल्यांनी तुम्हाला सोडून दिले आणि एसी ऑफिसमध्ये मजा लुटली, असे टीकास्त्र मोदी यांनी सोडले.
'मी माझ्या आदिवासी भावंडांना हिंसेच्या आगीत जळताना पाहू शकलो नाही. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली आणि आम्ही भारताला नक्षलवादी दहशतीतून मुक्त करण्याचा निर्धार केला. आज त्याचे परिणाम देशासमोर आहेत. पूर्वी जेथे बंदुका व बॉम्बची दहशत होती, तेथे आता परिस्थिती बदलली आहे. ७० वर्षांनंतर बिजापूरच्या चिकापल्ली गावात वीज पोहोचली आणि अबूझमाडच्या रेकावाया गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच शाळा सुरू झाली. पूर्वी दहशतीसाठी ओळखले जाणारे पुवर्ती गाव आज विकासाचे केंद्र बनले आहे आणि तेथे लाल झेंड्याऐवजी तिरंगा फडकत आहे, असे मोदी यांनी अभिमानाने सांगितले.
भारत जगात विश्वासार्ह भागीदार
कोणत्याही जागतिक संकटाच्या वेळी भारत नेहमी 'फर्स्ट रिस्पॉन्डर' म्हणून मदतीसाठी पुढे सरसावला आहे आणि तो एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उभा राहिला आहे, असे मोदी यांनी सांगितले.