
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल एनसीईआरटीने नवा अभ्यासक्रम तयार केला असून त्यामध्ये तीन व्यक्तींना फाळणीसाठी जबाबदार धरले आहे.
एनसीईआरटीने सहावी ते आठवी आणि नववी ते १२वी असे दोन मॉड्युल तयार केले आहेत. यात भारत-पाकिस्तान फाळणी कशी झाली आणि कोणत्या नेत्यांनी स्वीकारली, याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेली नाही, यासाठी तीन व्यक्ती, पक्ष जबाबदार होते. यामध्ये पहिले होते मोहम्मद अली जिना ज्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. दुसरी होती काँग्रेस अर्थात पं. नेहरू ज्यांनी फाळणी स्वीकारली आणि भारताचे अखेरचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ज्यांनी फाळणी लागू केली.
...तर फाळणी बरी
या पाठ्यक्रमामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी चुकीच्या विचारांमुळे झाली. मुस्लिम लीगने १९४० मध्ये लाहोरमध्ये एक बैठक घेतली होती. तेथे जिना यांनी म्हटले होते की, हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे धर्म आहेत. परंपरा वेगवेगळ्या आहेत. ब्रिटिशांची इच्छा होती की, भारत स्वतंत्र व्हावा, पण फाळणी होऊ नये. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी फाळणीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते.
सरदार पटेल हे सुरुवातीला फाळणीच्या बाजूने नव्हते, पण १९४७ मध्ये मुंबईतील एका सभेत त्यांनी म्हटले होते की, देश युद्धभूमी बनला आहे. दोन्ही समुदाय आता शांततेत राहू शकणार नाही. गृहयुद्ध होण्यापेक्षा फाळणी केलेली बरी, असे ते म्हणाले होते.
पुस्तकात म्हटले आहे की, माऊंटबॅटन यांनी म्हटले होते की, मी भारताची फाळणी केलेली नाही. याला भारतीय नेत्यांनीच मंजुरी दिली. मी फक्त ती शांततापूर्ण मार्गाने लागू करण्याचे काम केले. घाई करण्याची चूक माझी होती, पण त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी भारतीयांची होती. महात्मा गांधींनी फाळणीला विरोध केला, पण परिस्थिती अशी झाली की नेहरू आणि पटेलांनी गृहयुद्ध भडकण्याच्या भीतीने फाळणी स्वीकारली.
काँग्रेसची टीका
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर टीका केली आहे. एनसीईआरटीच्या मॉड्युलमध्ये पूर्ण सत्य सांगितले गेलेले नाही. यात फक्त काँग्रेस आणि जिना यांना फाळणीसाठी जबाबदार ठरवले गेले आहे हे अर्धसत्य आहे, असे ते म्हणाले.