यूपीए कडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर, मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा

शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथवरील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली
 यूपीए कडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर, मार्गारेट अल्वा यांच्या नावाची  घोषणा

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएने उमेदवार जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी यूपीएने आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसच्या माजी मंत्री आणि माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमदेवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी रविवारी यूपीएच्या घटक पक्षांसह विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली.

शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथवरील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार म्हणाले की, ‘‘सर्व बिगर भाजप पक्षांपैकी अनेकांशी आमची चर्चा झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमच्याकडून एक उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या. राज्यपाल म्हणूनदेखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्यदेखील होत्या,” असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसव्ही, मणी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएल, नॅशनल काँग्रेस, आरएलडी अशा एकूण १९ पक्षांचा पाठिंबा अल्वा यांच्या उमेदवारीसाठी मिळाला आहे. आम्ही ममता बॅनर्जींनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या बैठकीमध्ये होत्या. अरविंद केजरीवाल यांनीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराप्रमाणे उपराष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे कळवले आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in