मोदींच्या आईला शिवीगाळ प्रकरण : NDA चा बिहार बंद; पाटण्यात जाळपोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला झालेल्या शिवीगाळ प्रकरणी एनडीएने गुरुवारी बिहार बंदची हाक दिली होती त्याचे तीव्र पडसाद पाटणा, गयाजी, मुंगेरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उमटले.
(Photo - PTI)
(Photo - PTI)
Published on

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला झालेल्या शिवीगाळ प्रकरणी एनडीएने गुरुवारी बिहार बंदची हाक दिली होती त्याचे तीव्र पडसाद पाटणा, गयाजी, मुंगेरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उमटले. समस्तीपूर, बेगुसराय, छपरा, हाजीपूर, दरभंगा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आले. पाटणा येथे जाळपोळीचे प्रकार घडले असून काही ठिकाणी न्यायाधीश आणि सनदी अधिकाऱ्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

बंदमुळे काँग्रेस आणि राजद कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाटण्यात २ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट रोजी दरभंगा येथे मतदार हक्क यात्रेदरम्यान २७ ऑगस्ट रोजी राहुल-तेजस्वी यांच्या मंचावरून मोदी यांच्या आईला शिवीगाळ करण्यात आली. तेव्हापासून भाजप सातत्याने या प्रकाराचा निषेध करत आहे. दरभंगा येथे राहुल गांधी यांच्या मतदार हक्क यात्रेसाठी बांधलेल्या स्वागत मंचावरून मोदींच्या आईला शिवीगाळ करणाऱ्या मोहम्मद रिझवीला पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी अटक केली.

दानापूर येथे जाळपोळ

पाटण्यातील दानापूर येथील सगुणा वळणाजवळ भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आग लावली आणि सुगुणा-खगौल मुख्य रस्ता रोखला. यादरम्यान 'आम्ही आईचा अपमान सहन करणार नाही' अशा घोषणा देण्यात आल्या. बंदबाबत पाटणासह सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिस सतर्क आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस मुख्यालयाने सर्व एसएसपी, एसपी तसेच रेल्वे एसपींना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तोडफोड करणाऱ्या, गाड्या थांबवणाऱ्या किंवा जबरदस्तीने दुकाने बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

मोदी भावनिक

मंगळवारी जीविका दिदींच्या ऑनलाइन कार्यक्रमात मोदी म्हणाले, माझ्या आईचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ती या जगातही नाही. तरीही काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून तिला शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचे मला जितके दुःख आहे तितकेच बिहारच्या लोकांनाही तेवढेच दुःख आहे. मी माझे दुःख तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे मी हे दुःख सहन करू शकेन.

logo
marathi.freepressjournal.in