
नवी दिल्ली : देशभरात १५ राज्यांतील ४६ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ४६ जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला २६ जागा मिळाल्या असून, काँग्रेस ७, टीएमसी ६, सपा ३, आप ३, सीपीआय-एम, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भारत आदिवासी पक्ष यांना प्रत्येकी १ जागेवर विजय मिळाला आहे.
निवडणुकीपूर्वी या ४६ पैकी २७ जागा विरोधकांकडे होत्या. त्यापैकी एकट्या काँग्रेसला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी एनडीएकडे भाजपच्या ११ जागांसह एकूण १७ जागा होत्या. अशा प्रकारे भाजप आघाडीला एकूण ९ जागांचा फायदा झाला आहे.
पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत सत्तारूढ टीएमसीचे निर्विवाद वर्चस्व
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) निर्विवाद वर्चस्व मिळविले. तृणमूल काँग्रेसने पक्षाच्या ताब्यात असलेल्या पाच जागांवर विजय मिळवित सहावी जागा भाजपकडून खेचून आणली. आर. जी. कार रुग्णालयातील घटनेचा मतदारांवर कोणताच विपरीत परिणाम न झाल्याचे यावरून दिसून येत आहे, अशी चर्चा आहे.
कर्नाटक पोटनिवडणुकीत काँग्रेसचेच वर्चस्व
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसने भाजप-जनता दल (धर्मनिरपेक्ष) आघाडीचा सपशेल पराभव करीत तिन्ही जागांवर विजय मिळविला आहे.
बिहारमध्ये एनडीएला ४ जागा
पाटणा : बिहारमधील सत्तारूढ एनडीएने विधानसभा पोटनिवडणुकीत इमामगंजची जागा राखत इंडिया आघाडीकडून तरारी, रामगढ आणि बेलागंज या जागा हिसकावून घेतल्या.
आसाममध्ये भाजपचा विजय
गुवाहाटी : आसाममध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बेहाली मतदारसंघ कायम राखला आहे. भाजप उमेदवार दिगंत घाटोवाल यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी जयंत बोरा यांचा ९०५१ मतांनी पराभव केला.
राजस्थानमध्ये पाच जागांवर भाजपचा विजय
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने पाच जागा पटकावल्या असून भारत आदिवासी पार्टी आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा पटकावली आहे. काँग्रेसने दौसा तर भारत आदिवासी पार्टीने चोरासी जागेवर विजय मिळविला आहे. यापूर्वी या सात जागांपैकी काँग्रेसच्या ताब्यात चार तर भाजप, आरएलपी आणि बीएपीच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा होती.
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, सपाला धक्का
लखनऊ : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपने लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या नऊ जागांपैकी सहा जागांवर भाजपने बाजी मारली आहे, तर एक जागा भाजपचा मित्रपक्ष आरएलडीने जिंकली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देणाऱ्या समाजवादी पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी करणाऱ्या इंडिया आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. अखिलेश यादव कुटुंबीयांची परंपरागत जागा असलेल्या करहल आणि सीसामऊ या दोन जागांवर समावादी पक्षाला विजय मिळाला.
पंजाबमध्ये आपची बाजी
पंजाबमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आपने चार जागा, तर काँग्रेसने एक जागा पटकावली आहे. सिक्कीममध्ये दोन्ही जागा सिक्कीम क्रांतिकारी पक्षाने पटकावल्या आहेत. उत्तराखंडमधील एक जागा भाजपने पटकावली आहे, तर आसाममध्ये चार जागा भाजपने पटकावल्या आहेत, तर युनायटेड पीपल्स पार्टी आणि आसाम गणपरिषदेने प्रत्येकी एक जागा पटकावली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा पटकावली आहे.