भाजपप्रणित ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनकड यांना ५२८, तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. तर १५ मते बाद ठरली. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. धनकड ११ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
भाजपप्रणित ‘एनडीए’कडून जगदीप धनकड यांना, तर विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपचे लोकसभा आणि राज्यसभा असे मिळून ३९४ खासदार आहेत. याशिवाय जदयू, अण्णा द्रमुक, लोकजनशक्ती पार्टी, एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना खासदार, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, बसपा, अकाली दल, टीडीपी यांचा पाठिंबा असल्याने जगदीप धनकड यांचे पारडे जड मानले जात होते. कागदावर जगदीप धनकड यांना ५२७ खासदारांची मते मिळणार असल्याचे दिसून येत होते. एकूण ७२५ खासदारांनी मतदान केले. त्यापैकी १५ मते अवैध ठरली.
धनकड १९८९च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर १९९०मध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. १९९१मध्ये धनकड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी १९९३मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर २००३मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनकड यांची जुलै २०१९मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच्या संघर्षामुळे ते सतत चर्चेत राहिले.
उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची दांडी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसप्रणित आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला होता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या १२ खासदारांनी भाजपचे उमेदवार जगदीप धनकड यांना पाठिंबा दिला होता. शिंदे गटाच्या सर्व १२ आमदारांनी मतदान केले. उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे, विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर आणि संजय जाधव यांनी मात्र मतदान करण्याचे टाळले. त्यातील राऊत आणि जाधव यांनी आजारी असल्याचे कारण दिल्याचे समजते. कीर्तीकर आधीपासूनच आजारी आहेत. इतर दोघांचे मतदान न करण्याचे कारण समजू शकले नाही.