भारताशी संबंध सुधारण्यासाठी कठोर उपायांची गरज;मालदीवच्या विरोधी पक्षनेत्याचे वक्तव्य

भारताशी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी मालदीव सरकारने कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) अध्यक्ष फय्याझ इस्माईल यांनी व्यक्त केले आहे.
भारताशी संबंध सुधारण्यासाठी कठोर उपायांची गरज;मालदीवच्या विरोधी पक्षनेत्याचे वक्तव्य

माले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर समाजमाध्यमांवरून भारतविरोधी मते व्यक्त केली जाण्याचे प्रकरण गंभीर असून भारताशी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी मालदीव सरकारने कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) अध्यक्ष फय्याझ इस्माईल यांनी व्यक्त केले आहे. एमडीपी हा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मह मुईझू यांच्या विरोधातील प्रमुख पक्ष आहे. या पक्षाच्या अनेक नेत्यांनी भारताला पाठिंबा व्यक्त केला असून समाजमाध्यमांवर भारतविरोधी प्रतिक्रिया देणाऱ्यांचा निषेध केला आहे.

भारत हा मालदीवचा जुना आणि खात्रीशीर मित्र आहे. मालदीव पर्यटकांसाठी भारतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. दोन्ही देशांचे सौहार्दपूर्ण संबंध विकसित होण्यास अनेक वर्षे गेली आहेत. ते अशा कारणांमुळे बिघडवणे योग्य नाही. दोन्ही बाजूंकडून समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मालदीवच्या बडतर्फ झालेल्या नेत्यांनी केलेली भारतविरोधी वक्तव्ये वर्णद्वेषी होती. ती त्यांची वैयक्तिक मते होती आणि त्यातून मालदीवच्या जनतेच्या भावना व्यक्त होत नाहीत. आजकाल समाजमाध्यामांचा आवाका खूप वाढल्याने हे प्रकरण खूप वेगाने चिघळत गेले, त्यामुळे मालदीवच्या सरकारने भारताबरोबरील संबंध सुधारण्यासाठी आणि समाजमाध्यमांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपयायोजना केली पाहिजे, असे फय्याझ इस्माईल यांनी सांगितले. दरम्यान, चीन दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मुझू यांनी तेथील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या असून ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंगय यांच्याबरोबर महत्त्वाचे करार करणार आहेत. भारतीय पर्यटक येणार नसतील तर चीनने मालदीवला मदत करण्यासाठी त्यांच्या देशातून अधिक पर्यटक मालदीवला पाठवावेत, अशी विनंती मुईझू यांनी चिनी नेत्यांना केली.

मालदीव्ज असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स (माटाटो) या संघटनेने ईझमायट्रिप या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांना पत्र लिहून भारतातून मालदीवला जाणाऱ्या विमानांचे पुन्हा बुकिंग सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच समाजमाध्यमांवरून भारतविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्याच्या प्रकरणाबद्दल माफीदेखील मागितली आहे. समाजमाध्यमांवरून बॉयकॉट मालदीवची मोहीम सुरू झाल्यानंतर ईझमायट्रिप कंपनीने मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग बंद केले होते. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, ईझमायट्रिपचे सीईओ निशांत पिट्टी यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांची कंपनी विमा क्षेत्रातही पदार्पण करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in