
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नीट’ परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स’ने (एनबीईएमएस) हा निर्णय घेतला आहे.
या आधी ‘नीट’ परीक्षा ही १५ जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. ‘नीट’ची परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ‘एनबीईएमएस’ला दिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ‘एनबीईएमएस’चे अधिकृत पोर्टल वगळता इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. ‘नीट’च्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता, एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. यासंबंधी पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ‘नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने स्पष्ट केले आहे.
नवी तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या चार दिवसआधी अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून हे अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्डशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट पीजी’ परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पर्याय मिळतात, यात मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीजी डिप्लोमा कोर्सचा समावेश आहे.