‘नीट’ची परीक्षा रद्द; परीक्षा मंडळावर नामुष्कीची वेळ, २३ लाख विद्यार्थ्यांचा हिरमोड

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट-यूजीची परिक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुन्हा एकदा नापास झाली आहे.
‘नीट’ची परीक्षा रद्द; परीक्षा मंडळावर नामुष्कीची वेळ, २३ लाख विद्यार्थ्यांचा हिरमोड
‘नीट’ची परीक्षा रद्द; परीक्षा मंडळावर नामुष्कीची वेळ, २३ लाख विद्यार्थ्यांचा हिरमोड
Published on

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट-यूजीची परिक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुन्हा एकदा नापास झाली आहे. यंदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या अहवालानंतर तीन मे रोजी घेण्यात आलेली नीट-यूजी २०२६ ची परीक्षा मंगळवारी रद्द करण्यात आली. यामुळे देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली असून त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा आता नव्याने घेतली जाईल. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. एनटीएने एक्सवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास कायम राखण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारने ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे."

एनटीएने ३ मे रोजी ही परीक्षा भारतातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये घेण्यात आली होती. जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पेपरफुटी आणि इतर अनियमिततांच्या आरोपांची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात आली  एनटीए या तपासात पूर्ण सहकार्य करेल.

'गेस पेपर'राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला आहे.  परीक्षेपूर्वी सुमारे ४१० प्रश्नांचा एक 'गेस पेपर' विद्यार्थ्यांमध्ये फिरत होता. असा दावा केला जात आहे की, यातील सुमारे १२० प्रश्न केमिस्ट्रीशी संबंधित होते. हा पेपर परीक्षेच्या १५ ते ३० दिवस आधीच उपलब्ध झाला होता, ज्याची आता सखोल चौकशी केली जात आहे.

बिहारमध्ये नीट परीक्षेत सॉल्वर टोळी सक्रिय होती आणि ६० लाख रुपयांमध्ये एका जागेचा सौदा झाला होता. परीक्षेच्या अगदी आधी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता. याचा सूत्रधार एक एमबीबीएस विद्यार्थी होता. नालंदा पोलिसांनी टोळीतील ७ जणांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात समोर आले की, ही टोळी नीट परीक्षा पास करून देण्यासाठी एका उमेदवाराकडून ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत वसूल करत असे. यापैकी १.५ ते २ लाख रुपये आगाऊ म्हणून घेतले जात होते. यानंतर, परीक्षा केंद्रावर मूळ उमेदवाराऐवजी सॉल्वर बसवण्याची तयारी केली जात होती. मास्टरमाइंडने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी औरंगाबाद, जमुई आणि मुजफ्फरपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकून आणखी ४ आरोपींना अटक केली होती. हे सर्वजण परीक्षेत सॉल्वर बसवणार होते, परंतु मुख्य आरोपीला अटक झाल्यामुळे संपूर्ण टोळीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले.

एनएसयूआयचे आंदोलन

नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ दिल्लीत मंगळवारी एनएसयूआयतर्फे शास्त्री भवनाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांच्या हातात 'पंतप्रधान तडजोड करतात, पेपरमध्येही तडजोड होते', 'पेपर लीक, मोदी सरकार वीक' आणि 'डॉक्टरची पदवी विक्रीला आहे' अशा आशयाचे फलक पाहायला मिळाले. शास्त्री भवनाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग लावले होते. मात्र, तरीही आंदोलकांनी 'विद्यार्थ्यांवरील अत्याचार थांबवा' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

लवकरच परीक्षा

नीटचा पेपर फुटल्याच्या आरोपांची जबाबदारी स्वीकारत, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी मंगळवारी या परीक्षेच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक पुढील ७ ते १० दिवसांत जाहीर केले जाईल, असे घोषित केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया विस्कळीत होऊ नये यादृष्टीने या प्रक्रियेला पुढील ७ ते १० दिवसांत सुरुवात होईल. फेरपरीक्षा अत्यंत कमी कालावधीत घेऊन निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

नवीन नोंदणीची गरज नाही, फी परत मिळणार

  • विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. जुनाच डेटा वापरला जाईल.

  • नोंदणी तपशील आणि उमेदवारी तशीच पुढे नेली जाईल.

  • पूर्वी निवडलेली परीक्षा केंद्रे वैध राहतील.

  • कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

  • नवीन परीक्षेपूर्वी नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील.

logo
marathi.freepressjournal.in