
‘नीट’ परीक्षेतील अनियमितते संदर्भात, १५६३ विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अतिरिक्त गुण (ग्रेस मार्क्स) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्राने गुरूवारी (१३ जून) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. या १५६३ उमेदवारांना त्यांच्या वास्तविक गुणांची (ग्रेस गुणांशिवाय) माहिती दिली जाईल आणि त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. पुन्हा परीक्षा देण्याची त्या विद्यार्थ्यांची तयारी नसेल तर ५ मे रोजी झालेल्या परीक्षेवर आधारित त्यांचे गुण (ग्रेस गुणांशिवाय) विचारात घेतले जातील.
केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे वकील कानू अग्रवाल यांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाला सांगितले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) स्थापन केलेल्या समितीने “विद्यार्थ्यांची भीती दूर करण्यासाठी” हा निर्णय घेतला आहे. समितीने सर्व बाबी तपासल्यानंतर १५६३ विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करण्याची शिफारस करणे योग्य ठरेल असा निष्कर्ष काढला आहे. "१०, ११ आणि १२ जून रोजी समितीची बैठक झाली. समितीच्या शिफारशींच्या आधारे, ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची गुणपत्रिका रद्द केली जाईल आणि या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात येईल," असे केंद्राने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी दोन पर्याय -
ग्रेस मार्क्स मिळालेले विद्यार्थी २३ जून रोजी पुन्हा परीक्षेला बसू शकतात. ३० जून रोजी निकाल जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नसेल ते त्यांच्या जुन्या गुणांसह (ग्रेस गुणांशिवाय) समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकतात. पुन्हा परीक्षा द्यायची की नाही हा निर्णय सर्वस्वी विद्यार्थ्यांचा असणार आहे.
समुपदेशन प्रक्रिया थांबवू नका
NEET-UG 2024 साठी समुपदेशन प्रक्रिया थांबवू नये असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. "समुपदेशन वेळापत्रकानुसार सुरू राहील आणि त्यात कोणताही व्यत्यय येणार नाही. परीक्षा सुरू राहिल्यास, इतर सर्व गोष्टीही पुढे जातील, त्यामुळे चिंतेचे कारण नाही." असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे समुपदेशन ६ जुलैपासून सुरू होईल, असे केंद्राने सांगितले.
...म्हणून एनटीएने दिले ग्रेस मार्क्स
नीट परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपी उशिरा वितरित केल्या गेल्या किंवा चुकीच्या प्रश्नपत्रिका दिल्यामुळे वेळेचे नुकसान झाल्याच्या कारणास्तव १५६३ विद्यार्थ्यांना नुकसानभरपाईचे गुण एनटीएकडून प्रदान करण्यात आले होते.
ग्रेस मार्क्समुळे ७२० पैकी ७२० गुण-
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे देशात ५ मे रोजी घेण्यात आलेली NEET-UG 2024 परीक्षा सुमारे २४ लाख उमेदवारांनी दिली. निकाल १४ जून रोजी जाहीर होणार होता, परंतु ४ जून रोजी जाहीर करण्यात आला, कारण उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आधी करण्यात आले होते. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आणि १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्याच्या आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त सात उच्च न्यायालयांमध्ये निषेध आणि खटले सुरू झाले. चौकशीच्या मागणीसाठी १० जून रोजी दिल्लीत अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आणि ६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांमुळे अव्वल क्रमांक मिळाल्याचा आरोप केला. कोणताही विचार न करता देण्यात आलेल्या ग्रेस मार्क्समुळे ७२० पैकी ७२० असे अशक्यप्राय गुणही विद्यार्थ्यांना मिळाल्याचा आरोप आंध्र आणि तेलंगणातील याचिकाकर्त्यांनी केला. एकाच कोचिंग सेंटरमधील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचेही याचिकांमध्ये नमूद आहे.
८ जुलै रोजी सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आरोपांच्या आधारे NEET-UG 2024 रद्द करण्याच्या मागणीच्या सर्व याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी घेतली जाईल.