‘नीट’ची सुनावणी १८ जुलैपर्यंत लांबणीवर

‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करावी, फेरपरीक्षा घ्यावी अथवा परीक्षेतील अनियमिततेची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.
‘नीट’ची सुनावणी १८ जुलैपर्यंत लांबणीवर
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa
Published on

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द करावी, फेरपरीक्षा घ्यावी अथवा परीक्षेतील अनियमिततेची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १८ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. याबाबत केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ने दिलेले स्पष्टीकरण अद्यापही काही संबंधितांना मिळालेले नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्णय घेतला. केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ने बुधवारी स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे सादर केली, ती काही याचिकाकर्त्यांच्या वकिलांना अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याबाबतची सुनावणी १८ जुलैपर्यंत तहकूब करीत असल्याचे सांगितले. तथापि, संबंधित पक्षकारांना आम्ही प्रतिज्ञापत्रे दिली आहेत, असे केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.

‘नीट-यूजी’ परीक्षेत झालेल्या अनियमिततेचा तपास करणाऱ्या सीबीआयने स्थितीदर्शक अहवाल सादर केला असल्याचे पीठाने सांगितले. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, नीट परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण आयआयटी, मद्रासने केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार घडल्याचे दिसून येत नाही. ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने ८ जुलै रोजी स्पष्ट केले होते.

‘नीट’ पेपरफुटीतील मुख्य आरोपी रॉकीला अटक

‘नीट-यूजी’ पेपरफुटी प्रकरणातील एक मुख्य आरोपी रॉकी ऊर्फ राकेश रंजन याला सीबीआयने गुरुवारी पाटणा येथून अटक केली. रॉकी हा मुख्य सूत्रधार संजीव मुखिया याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षेतील अनियमितता उघड झाल्यापासून रॉकी पसार झाला होता. त्याला पाटणा येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची १० दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in