

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दिल्ली न्यायालयाने शनिवारी १४ आरोपीविरुद्ध औपचारिकरीत्या आरोप निश्चित केले. आरोपींनी आरोप मान्य न करता दोषी नसल्याचा दावा केला. या खटल्याची सुनावणी २५ नोव्हेंबरपासून दररोज सुरू होणार आहे. यापूर्वी न्यायालयाने आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि परीक्षेतील गैरप्रकारांसह विविध गुन्ह्यांमध्ये प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे म्हटले होते.
मुख्य तीन आरोपी मनीषा गुरुनाथ मंधारे, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा संजय हवालदार हे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीशी (एनटीए) संबंधित असल्याने सार्वजनिक सेवक असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. त्यांनी सहआरोपींशी संगनमत करून गोपनीय प्रश्नपत्रिका बेकायदा मिळवल्याचा आरोप आहे. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हेगारी कट, विश्वासघात, फसवणूक आणि सार्वजनिक सेवकांकडून गैरवर्तन केल्याचे आरोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
उर्वरित ११ आरोपींमध्ये तेजस हर्षदकुमार शहा, शिवराज मोटेगावकर, मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मंगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल आणि शेषराव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या खासगी व्यक्तींनी गोपनीय प्रश्नपत्रिकेच्या बेकायदा वितरणाच्या साखळीत सामील होऊन गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि विश्वासघाताशी संबंधित आरोप निश्चित करण्यात आले आहेत.