

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपर लीक प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात सोमवारी पहिलीच सुनावणी तहकूब करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) वतीने एकही वकील न्यायालयात उपस्थित न राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला.
विशेष न्यायाधीश अनु ग्रोवर बलीगा यांच्यासमोर या प्रकरणातील आरोपी दिनेश बिवल आणि विकास बिवल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात नमूद केले की, सकाळी १०:४५ वाजेपर्यंत सरकारी पक्षाच्या वतीने जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी कोणीही न्यायालयात हजर राहिले नाही.
२३ जुलै रोजी जलद सुनावणीसाठी या न्यायालयाची 'विशेष फास्ट-ट्रॅक कोर्ट' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची यापूर्वी सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी शुक्रवारी सर्व १३ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. या प्रकरणातील आरोपी बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज भगवानराव शिरुरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. तपासावरून डॉ. शिरुरे हे संघटित पेपर लीक टोळीतील एक सक्रिय कटकारस्थानी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
आरोपींच्या वकिलांचीही विनंती
रोहिणी जिल्हा न्यायालयात दुसऱ्या एका खटल्यासाठी जायचे असल्याने आणि अधिक वेळ वाट पाहणे शक्य नसल्याने सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.