नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने ‘नीट-पीजी २०२५’च्या क्वालिफाइंग कट-ऑफमध्ये मोठी कपात केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. या निर्णयामुळे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आता उणे ४० पर्सेंटाइल गुण मिळाले तरीही ‘एमएस-एमडी’सारख्या पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. जनरल आणि ईड्ब्ल्यूएस प्रवर्गासाठीही कट-ऑफ कमी करण्यात आला आहे.
हा निर्णय मुख्यतः मेडिकल पीजी कोर्सेसमधील हजारो रिक्त जागा भरून काढण्यासाठी घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या धोरणामुळे देशाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
कट-ऑफ कपात
आतापर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी ‘नीट पीजी’मध्ये किमान ४० पर्सेंटाइल आवश्यक होता. म्हणजेच ८०० गुणांच्या परीक्षेत साधारण २३०-२४० गुण मिळवणे बंधनकारक होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हा निकष थेट शून्यपेक्षा खाली आणण्यात आला आहे. याचा अर्थ, अत्यंत कमी किंवा निगेटिव्ह स्कोअर असलेले उमेदवारही जागा उपलब्ध असल्यास प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा ‘नीट पीजी २०२५’ची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू असून, तिसरी काऊन्सिलिंग अद्याप सुरू झालेली नाही. अंदाजे ९ हजारांहून अधिक पीजी मेडिकल सीट्स रिक्त राहण्याची शक्यता होती. पात्र उमेदवारांची संख्या अपुरी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.