NEET UG Online Exam : पुढील वर्षापासून ‘नीट’ची परीक्षा संगणकावर; यंदाची फेरपरीक्षा २१ जून रोजी

वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट-यूजी फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली.
NEET UG Online Exam : पुढील वर्षापासून ‘नीट’ची परीक्षा संगणकावर; यंदाची फेरपरीक्षा २१ जून रोजी
NEET UG Online Exam : पुढील वर्षापासून ‘नीट’ची परीक्षा संगणकावर; यंदाची फेरपरीक्षा २१ जून रोजी(संग्रहित छायाचित्र FPJ)
Published on

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट-यूजी फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केली. गेल्या काही दिवसांत नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या आरोपांमुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता, पुढील वर्षापासून ही परीक्षा पूर्णपणे संगणकावर आधारित पद्धतीने घेतली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

विद्यार्थ्यांचे भविष्य हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून परीक्षेतील कोणत्याही अनियमिततेबाबत 'झीरो टॉलरेंस' धोरण अवलंबले जाईल, असे प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट-यूजी) ३ मे रोजी पार पडली होती, मात्र प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर ती रद्द करण्यात आली.

शिक्षण माफियांचा कट किंवा पैशाच्या जोरावर कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

अधिक सुरक्षित पद्धत

संगणकावर आधारित परीक्षा पद्धती ही ओएमआर पद्धतीपेक्षा अधिक सुरक्षित आणि उत्तम असल्याचे प्रधान म्हणाले. ७ मे रोजी 'गेस पेपर्स' संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली होती. ८ ते ११ मे दरम्यान झालेल्या सखोल चौकशीत जेव्हा प्रश्नपत्रिका फुटल्याची खात्री पटली, तेव्हा १२ मे रोजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी परीक्षेच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांना कडक शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

१५ मिनिटांचा वाढीव वेळ

प्रधान यांनी सांगितले की, फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे परीक्षा शहर पुन्हा निवडण्याची मुभा देण्यात येईल आणि १४ जूनपर्यंत त्यांना प्रवेशपत्रे (अॅडमिट कार्ड्स) उपलब्ध करून दिली जातील. याशिवाय, परीक्षेचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवण्यात आला असून दुपारी २ ते ५ ऐवजी आता ही परीक्षा ५.१५ वाजेपर्यंत चालेल. विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधणार असून आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टीईटी परीक्षा २८ जूनला

मुंबई: नीट आणि टीईटी परीक्षा एकाच दिवशी असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. त्यामुळे २१ जूनऐवजी ही परीक्षा २८ जून रोजी होणार आहे. परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना १६ जून ते २८ जून या कालावधीत प्रवेश पत्राची प्रिंटआऊट काढून घेता येईल. टीईटी परीक्षा पेपर क्रमांक एक २८ जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. त्याचप्रमाणे टीईटी परीक्षा पेपर क्रमांक दोन २८ जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेतला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in