‘नीट’प्रकरणी एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला CBI कडून अटक; 'सॉल्व्हर मोड्युल'ची सदस्य असल्याचा आरोप

‘नीट-यूजी’चे पेपर चोरणाऱ्या अभियंत्यासमवेत ती काम करीत होती आणि तिने पेपर सोडविले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘नीट’प्रकरणी एमबीबीएसच्या विद्यार्थिनीला CBI कडून अटक; 'सॉल्व्हर मोड्युल'ची सदस्य असल्याचा आरोप
Published on

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला अटक केली आहे. रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) या संस्थेतील ही विद्यार्थिनी आहे. ‘नीट-यूजी’चे पेपर चोरणाऱ्या अभियंत्यासमवेत ती काम करीत होती आणि तिने पेपर सोडविले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या विद्यार्थिनीचे नाव सुरभीकुमारी असे असून तिची दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. पंकजकुमार याने चोरलेले पेपर सोडविण्यासाठी ती ५ मे रोजी, ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या दिवशी हजारीबाग येथे हजर होती. ती चोरलेले पेपर सोडवणाऱ्या 'सॉल्व्हर मोड्युल'मधील पाचवी सदस्य असल्याचा आरोप आहे.

सीबीआयने नीट-यूजी पेपरफुटीचा तपास हाती घेतल्यापासून आतापर्यंत याप्रकरणी १६ जणांना अटक केली आहे. ‘रिम्स’ ही झारखंड सरकारच्या अधिपत्याखालील स्वायत्त संस्था आहे.

logo
marathi.freepressjournal.in