शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नका

माजी लष्करप्रमुखांचा सैन्य दलांना इशारा
शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नका

द्रास : कायम दक्ष राहा, आपल्या शत्रूंवर कधीही विश्वास ठेवू नका. तो पाकिस्तान किंवा चीन असू दे, असा स्पष्ट इशारा माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी सैन्य दलांना दिला आहे.

जुलै रोजी कारगिल युद्ध दिवस आहे. कारगिलच्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मलिक हे द्रासच्या लोचामेन पॉइंटवर आले होते. तेथे त्यांनी कारगिल युद्धाच्या वीरांच्या व कुटुंबीयांच्या आठवणी जागवल्या. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात मलिक हे लष्करप्रमुख होते. त्यानिमित्त त्यांनी सैन्य दलांना इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास भारत हा कारगिलपेक्षा अधिक सुसज्ज आहे. १९९९ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये लाहौर करार झाला. दोन्ही देशांनी अण्वस्त्र स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरवले. तसेच पारंपरिक किंवा अपारंपरिक संघर्ष न करण्याचे ठरवले, पण काही महिन्यांत भारतीय भूभागात मुजाहिदीन, जिहादींनी नव्हे तर पाकिस्तान लष्कराने घुसखोरी केली. त्यामुळे कोणी मैत्री म्हणूनही राजकीय शोबाजी केल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. कारगिलपासून युद्धापासून शिकण्याचा मोठा धडा म्हणजे शत्रूवर कदापि विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले.

शस्त्रसंधी असो किंवा नको. मात्र, अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर व नियंत्रणरेषेवर सैन्य दलांनी कायम दक्ष राहावे. शत्रूने भारतावर आश्चर्यकारक हल्ला केल्यास तो परतावून लावण्याचे सामर्थ्य भारतीय लष्करात असल्याचे कारगिल युद्धातून दाखवून दिले आहे. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आपण लढायला तयार आहोत. आपण शस्त्रसज्ज असून, टेहळणीची क्षमता वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.

१९९९ च्या कारगिल युद्धाच्या आठवणी जागवताना ते म्हणाले की, त्या काळात केवळ कठीण भूप्रदेश, वातावरणच नव्हे तर शस्त्रास्त्रांचे आव्हान होते. त्यामुळे अनेक जवान शहीद व जखमी झाले. तसेच आपल्याकडे पुरेशा प्रमाणात माहिती नव्हती. जेव्हा आपल्याकडे शत्रूची माहिती आली तेव्हा पाकिस्तानला कारगिलच्या टेकड्यावरून परतवून लावले. टोलोलिंकचा विजय हा मोठा टर्निंग पॉइंट होता. तेव्हा मला युद्ध जिंकण्याचा विश्वास निर्माण झाला. दुसऱ्या राजपुताना रायफल्सने टोलोलिंकवर विजय मिळवला. त्यामुळे श्रीनगर-लेह महामार्गावर नजर ठेवता येते. कारगिल व लेहला या रस्त्याने रसद पुरवली जाते, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in