छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी ग्रहण केली शपथ ;शपथविधी समारंभाला पंतप्रधानासह शहा, गडकरी यांचीही उपस्थिती

उमा भारती, बाबुलाल गौर आणि शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर २००३ पासून ते भारतीय जनता पक्षाचे राज्याचे चौथे इतर मागासवर्गीय (ओबीसी) मुख्यमंत्री आहेत
छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी ग्रहण केली शपथ ;शपथविधी समारंभाला पंतप्रधानासह शहा, गडकरी यांचीही उपस्थिती
PM

रायपूर/भोपाळ : ज्येष्ठ भाजप नेते आणि पक्षातील आदिवासी समाजाचा एक चेहरा असणारे विष्णु देव साय यांनी बुधवारी छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रायपूर येथील सायन्स ग्राऊंडवर झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि उज्जैन दक्षिणचे आमदार मोहन यादव यांनी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर घेतली. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी त्यांना शपथ देवविली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री साय यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि रामदास आठवले आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. तसेच यावेळी भाजपचे छत्तीसगडचे अध्यक्ष अरुण साहू, सरचिटणीस विजय शर्मा या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे त्यांचे समकक्ष हिमंता बिस्वा सरमा, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि इतर राज्यांतील पक्षाचे नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यात कडेकोट बंदोबस्तात सुमारे ५० हजार लोक यावेळी उपस्थित होते.

 यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंह देव उपस्थित होते.कार्यक्रमानंतर बघेल यांनी मंचावर पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन केले. कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण चंदेल म्हणाले की, नवे मुख्यमंत्री लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील जे संतुलित असेल.

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांनी शपथ ग्रहण केली, त्यावेळी त्यांच्याबरोबर जगदीश देवडा (मंदसौरमधील मल्हारगडचे आमदार) आणि राजेंद्र शुक्ला (रीवाचे आमदार) यांना राज्यपालांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. या शपथविधी समारंभालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि यादव यांचे पूर्ववर्ती शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नितीन गडकरी हेही उपस्थित होते.

उमा भारती, बाबुलाल गौर आणि शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर २००३ पासून ते भारतीय जनता पक्षाचे  राज्याचे चौथे इतर मागासवर्गीय (ओबीसी) मुख्यमंत्री आहेत. यादव यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्याने जवळपास दोन दशके राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे भाजपचे दिग्गज आणि चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांचे युग समाप्त झाल्याचे मानले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in