दिल्ली चेंगराचेंगरी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश; १८ ठार, १० पेक्षा जास्त जखमी

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यानिमित्ताने अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. चेंगराचेंगरी तसेच आग लागण्याच्या घटना घडत असतानाच, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.
शनिवारी (दि.१५) रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी
शनिवारी (दि.१५) रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीपीटीआय
Published on

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यानिमित्ताने अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. चेंगराचेंगरी तसेच आग लागण्याच्या घटना घडत असतानाच, शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ लोकांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे स्थानकांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सील करून सुरक्षित करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुले आहेत. यापैकी सर्वाधिक ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरयाणातील आहेत. जखमींवर लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभसाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. प्रयागराज महाकुंभला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

चेंगराचेंगरीनंतर बहुतेक जखमींना शरीराच्या खालच्या बाजूला जखमा झाल्या आहेत. काहींच्या हाडांना दुखापत झाली आहे. चार जणांवर उपचार सुरू असून उर्वरित जखमींना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर १५ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. चेंगराचेंगरीनंतर लोकांचे बूट, फाटलेल्या पिशव्या आणि कपडे अस्ताव्यस्त विखुरले होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन प्लॅटफॉर्म स्वच्छ केला. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेला काही तास होत नाही तोच प्लॅटफॉर्म नंबर-१६ वर पुन्हा प्रचंड गर्दी झाली होती. लोकांनी मिळेल त्या वाटेने, खिडक्यांद्वारे आत घुसून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज जंक्शनवरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरासह फूट ओव्हर ब्रिजवरील व्यवस्थेची जबाबदारीची सूत्रे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती घेतली आहेत.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, लोक अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर जाऊ लागल्याने चेंगराचेंगरी झाली. सहसा, महाकुंभसाठी नियोजित विशेष गाड्या प्लॅटफॉर्म १४ आणि १६ वर येतात. महाकुंभला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म १४ वर उशिरा आली, त्यानंतर प्रयागराजहून एक ट्रेन प्लॅटफॉर्म १६ वर येत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकांचा गोंधळ सुरू झाला. मात्र, गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. प्लॅटफॉर्मही बदलण्यात आला नाही. पादचारी पुलावरून एका प्रवाशाचा पाय घसरल्याने ही घटना घडली, असे स्पष्टीकरण रेल्वेने दिले.

मृतांचा आकडा सरकार लपवत आहे - राहुल गांधी

चेंगराचेंगरीमधील मृत्यूंचे सत्य लपवले जात आहे. सरकारची असंवेदनशीलता आणि रेल्वेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित होते, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या कुटुंबातील प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या सर्वांना यंत्रणांकडून योग्य ती मदत दिली जाईल,” असे मोदी यांनी म्हटले आहे.

परिस्थिती आता नियंत्रणात - रेल्वेमंत्री

“नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत,” असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भारतीय रेल्वेकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, तर गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in