बिहारमध्ये उद्या नवीन सरकार?

बिहारमध्ये उद्या नवीन सरकार?

नितीश कुमार यांनी रविवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहार सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली : बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून जदयू व राजदमध्ये वाद टोकाला गेला आहे. जदयूचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे रविवारी नवीन सरकार बनवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. नितीश कुमार हे पुन्हा भाजपसोबत येऊ शकतात व तेच नवीन सरकार बनवण्याचा दावा करू शकतात. नवीन सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपचे दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

नितीश कुमार यांनी रविवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बिहार सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे संकेत मिळत आहेत. पाटण्यात झालेल्या प्रजासत्ताक दिवसाच्या कार्यक्रमात याचीच झलक दिसून आली. मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे एकमेकांपासून दूर बसलेले दिसले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळची एक खुर्ची रिकामी होती. हे प्रकार समोर आल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राजद व जदयूतील संबंध बिघडल्याचे संकेत दिसत होते. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘घराणेशाही’वर जोरदार टीका केली. त्यानंतर राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत असतानाच ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी नव्हती, असे ते म्हणाले. लालू प्रसाद यांचा लहान मुलगा तेजस्वी यादव हे नीतीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांचा मोठा मुलगा राज्य सरकार मंत्री आहे. जदयूचे राजकीय सल्लागार व प्रवक्ता त्यागी म्हणाले की, नितीश कुमार हे कर्पुरी ठाकूर यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. सर्व महान समाजवाद्यांप्रमाणेच ठाकूरही घराणेशाहीचाविरोध करत होते. हीच बाब नितीश कुमार यांना अधोरेखित करायची होती, असे ते म्हणाले.

बिहारमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका?

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याच्या नितीश कुमार यांच्या मागणीवर गुप्तता बाळगली जात आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडीतील कँग्रेस व राजद यांच्याकडेही हीच मागणी केली होती. मात्र, त्यांनी जदयूची मागणी मान्य केली नाही. भाजप आता याबाबत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारण कायमचे दरवाजे बंद होत नाहीत

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले की, राजकारणात कायमचे दरवाजे बंद होत नाहीत. दरवाजे बंद होऊ शकतात तर उघडूही शकतात. राजकारण हा संभावनांचा खेळ असून काहीही होऊ शकते.

सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री ?

बिहारमध्ये नवीन सरकार बनल्यास सुशील मोदी यांना उपमु‌ख्यमंत्री बनवले जाऊ शकते. तर राजद-जदयू महाआघाडीपूर्वी भाजप-जदयू आघाडी असताना जितके विभाग भाजपकडे होते. ते त्यांना परत दिले जाऊ शकतात. जदयूने आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलवले आहे.

चिराग पासवान सक्रीय

बिहारमधील राजकारणावर लोजपा (रामविलास)हे लक्ष ठेवून आहेत. ते पाटण्याहून दिल्लीला जात आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांसोबत चर्चा केली. योग्यवेळी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in