इंडिया आघाडीचे नवे ब्रीदवाक्य ‘मै नही, हम’ मोदींना आव्हान देण्यासाठी नीती : १९ डिसेंबर रोजी बैठक

मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे २०२४ साली जनता त्यांना पुन्हा सत्ता देर्इल, असे भाजप मोठ्या विश्वासाने सांगत आहे
इंडिया आघाडीचे नवे ब्रीदवाक्य ‘मै नही, हम’
मोदींना आव्हान देण्यासाठी नीती : १९ डिसेंबर रोजी बैठक

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करतांना सर्वमान्य अजेंडा तयार करणे हे ‘इंडिया’ आघाडीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच जागा वाटप मुद्दा, संयुक्त सभा घेणे ही देखील मोठी आव्हाने ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी येत्या १९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत बैठक घेणारत आहे.

इंडिया आघाडीची ही चवथी बैठक असेल. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी आपल्या एक्स खात्यावर पोस्ट करुन मंगळवार १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचे नमूद केले आहे. या बैठकीत ‘ मै नही, हम’ ही थीम घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत या थीमच्या माध्यमातूनच लढा देण्यात येणार आहे. कॉंग्रेस पक्षाची पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे २०२४ साली जनता त्यांना पुन्हा सत्ता देर्इल, असे भाजप मोठ्या विश्वासाने सांगत आहे. यामुळे इंडिया आघाडीसमोर जनतेसमोर पर्यायी सकारात्मक अजेंडा सादर करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आगामी चवथ्या बैठकित विरोधी पक्ष जागावाटपावर आणि संयुक्त सभा घेण्याबाबत विचारविनिमय करण्यास प्राधान्य देतील. विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे जनतेने या निवडणुकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना झिडकारले असा अर्थ होत नाही असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. जातनिहाय जनगणना आणि जुनी पेन्शन योजना आणणे हे दोन मुद्दे विरोधकांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीत उपस्थित केले होते. काँग्रेस पक्ष २०२४ निवडणुकीसाठी एखादा आगळावेगळा मुद्दा नक्कीच उपस्थित करेल असे रमेश यांनी सांगितले आहे. मै नी हम ही घोषणा मात्र मोदींचा विरोध करण्यासाठी उपयुक्त ठरेल याचा रमेश यांनी पुनरुच्चार केला आहे. तसेच अदाणींचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा बाहेर काढण्यात येर्इल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in