अयोध्या : राम मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. दररोज सुमारे दोन ते तीन लाख भाविक रामदर्शन घेत असल्याचे सांगितले जात आहे. देणगीतही प्रचंड वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपये रामचरणी अर्पण केले जात आहेत. राम मंदिरातील भाविकांची वाढती संख्या पाहता ट्रस्ट पुन्हा एकदा पुजाऱ्यांची भरती करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी ट्रस्ट विविध टप्प्यांवर चाचपणी करून पात्र पुजाऱ्यांची निवड करेल देशभरातून भाविक राम मंदिरात पोहोचत असून रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. राम मंदिरात सेवेत गुंतलेले लोक रात्रंदिवस रामलल्लासोबत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही काळजी घेत आहेत.
रामलल्लाची पूजा मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या देखरेखीखाली होत आहे. राम मंदिरासाठी नव्याने नियुक्त झालेल्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी भगव्या रंगाचा कुर्ता आणि धोतर असा ड्रेसकोड आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. पुरोहितांसाठी तयार करण्यात येत असलेल्या ड्रेसकोडमध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील मंदिरांच्या परंपरांचा समन्वय दिसून येईल.