भारतात डायनोसॉरच्या नव्या प्रजातीचा शोध

नर्मदा नदीच्या खोऱ्यात सापडलेल्या डायनोसॉरला राजासॉरस नर्मदेन्सिस असे नाव दिले होते
भारतात डायनोसॉरच्या नव्या प्रजातीचा शोध

नवी दिल्ली : राजस्थानमधील जैसलमेरजवळ शास्त्रज्ञांना डायनोसॉरच्या नव्या प्रजातीचे जीवाष्म आढळून आले आहेत. हे जीवाष्म सुमारे १६७ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. डायनोसॉरच्या या नवीन प्रजातीला राजस्थानमधील थर वाळवंटावरून नाव देण्यात आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुरकी (आयआयटी-रुरकी) आणि जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) या संस्थांच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे हे संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात नुकतेच छापून आले. हे नियतकालिक नेचर या प्रसिद्ध नियतकालिकाच्या प्रकाशकांमार्फतच छापले जाते. जैसलमेरजवळच्या प्रदेशात मध्य ज्युरासिक युगातील खडक आहेत. त्या भागात जीएसआयने २०१८ सालापासून उत्खनन चालवले होते. त्यातून हे जीवाष्म मिळाले आहेत. ते साधारण १६७ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. त्यात डायक्रिओसॉरिड प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष सापडले. या प्रकारचे डायनोसॉर वनस्पतींवर उपजीविका करत असत आणि त्यांची मान लांब असे.

आजवर अशा प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि चीन येथे सापडले आहेत, मात्र भारतात डायक्रिओसॉरिड प्रकारच्या डायनोसॉरचे अवशेष प्रथमच सापडले आहेत. आजवर जगातील सर्वात जुने डायक्रिओसॉरिडचे जीवाष्म चीनमधील असल्याचे मानले जात होते. चीनमध्ये १६४ ते १६६ दशलक्ष वर्षांपूर्वीचे डायक्रिओसॉरिडचे जीवाष्म मिळाले आहेत. मात्र, भारतात सापडलेले जीवाष्म त्याहून प्राचीन आहेत. तसेच ते आजवर शास्त्रज्ञांना माहीत नसलेल्या डायनोसॉरचे अवशेष आहेत.

नावात भारताचा उल्लेख

जैसलमेरजवळ सापडलेल्या डायनोसॉरच्या नवीन प्रजातीचे शास्त्रीय नाव थरोसॉरस इंडिकस असे ठेवले आहे. त्यातील थर हा शब्द राजस्थानमधील थर वाळवंटावरून, तर इंडिकस हा शब्द भारतावरून घेतला आहे. शास्त्रीय परिभाषेत थरोसॉरस हा जिनस आणि इंडिकस ही स्पिशिज अशी योजना असते. यापूर्वी नर्मदा नदीच्या खोऱ्यात सापडलेल्या डायनोसॉरला राजासॉरस नर्मदेन्सिस असे नाव दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in