वर्तमानपत्राच्या कागदाच्या दरात गेल्या १६ महिन्यांत १७५ टक्के झाली वाढ

वर्तमानपत्राच्या कागदाच्या दरात गेल्या १६ महिन्यांत १७५ टक्के झाली वाढ

वर्तमानपत्राच्या कागदाच्या दरात गेल्या १६ महिन्यांत १७५ टक्के झालेली वाढ, छपाईच्या शाईच्या वाढलेल्या किमती, प्लेटचे वाढीव दर आणि डिझेल-गॅसवाढीमुळे वितरणाचा वाढलेला खर्च यामुळे भारतात वर्तमानपत्राची आर्थिक परिस्थिती गंभीर बनलेली आहे. तरीही जगाच्या तुलनेत भारतात वर्तमानपत्र महिनाभरात अवघ्या १५० ते २५० रुपयांत मिळत आहेत. तर अमेरिकेत एका वर्तमानपत्राचे महिन्याचे बिल सात हजार रुपये मोजावे लागते.
वर्तमानपत्र चालवणे सध्या मोठे जिकिरीचे बनले आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धामुळे वर्तमानपत्रासाठी लागणाऱ्या कागदाचा तुटवडा जाणवत आहे. या कागदाचा दर एक मेट्रिक टनला ११०० डॉलर्सवर पोहोचला आहे. १६ महिन्यांपूर्वी हाच कागद ४५० डॉलर्सला मिळत होता. कागदासोबत छपाईची शाई, प्लेट व वितरण खर्च वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत समुद्राद्वारे होणाऱ्या मालवाहतूक भाड्यांचे दर चारपट वाढले आहेत.
जगात प्रमुख देशांमध्ये वर्तमानपत्राचे महिन्याचे बिल हजारांच्या घरात जाते. अमेरिकेत एका महिन्याचे पेपरचे बिल ७,८०० रुपये, ऑस्ट्रेलियात ३,३५० ते ४,५०० रुपये, इंग्लंडमध्ये २,६४० ते ६,७०० तर पाकिस्तानात ३०० ते ३५० रुपये येते. त्या तुलनेत भारतात महिन्याचे सरासरी पेपर बिल १५० ते २५० रुपये असते.
आयात कराव्या लागणाऱ्या वर्तमानपत्राच्या कागदाच्या किमती १६ महिन्यांत १७५ टक्के, तर भारतीय कागद ११० टक्के महाग झाला आहे. वर्तमानपत्रात सर्वात जास्त खर्च कागदावर होतो. त्यासाठी ५० ते ५५ टक्के रक्कम खर्च होते. तर छपाईची शाई, शाई प्लेट, वितरण आदींचा खर्च १० ते १५ टक्के वाढला आहे. कोविडकाळात जाहिराती कमी झाल्याने वर्तमानपत्रांच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in