पुढील युद्ध लवकरच! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक इशारा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख उत्तर दिले. त्यातच आता आपण ज्याचा विचार करत आहोत, ते पुढचे युद्ध लवकरच होऊ शकते. आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाईत उतरावे लागेल, असा सूचक इशारा लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.
पुढील युद्ध लवकरच! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक इशारा
Published on

मद्रास : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख उत्तर दिले. त्यातच आता आपण ज्याचा विचार करत आहोत, ते पुढचे युद्ध लवकरच होऊ शकते. आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. यावेळी आपल्याला मिळून लढाईत उतरावे लागेल, असा सूचक इशारा लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.

आयआयटी, मद्रास येथे आयोजित एक विशेष कार्यक्रमात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी बोलत होते. त्यांनी सांगितले की, “यापुढील युद्धात धोका जास्त असू शकतो. समोरील देश हे युद्ध एकट्याच्या जोरावर नव्हे तर दुसऱ्या देशांचे समर्थन घेऊन लढू शकतो. मात्र, एकट्या देशाने हे युद्ध लढले जाऊ शकत नाही, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भारताला सावधगिरी बाळगावी लागेल. भारतीय सैन्यसुद्धा हे युद्ध एकटे लढणार नाही. आपला देश सैन्य, नौदल आणि हवाई दल या सर्वच क्षेत्रात आघाड्यांवर सक्षम आहे. मात्र, आतापर्यंतची युद्धे जमिनीवर लढली गेली असल्याने, लोकांची मानसिकता लक्षात घेता, विजयाचा झेंडा हा जमिनीवरच गाडला जाईल.”

“२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही घडले, त्याने संपूर्ण देश हादरला होता. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी आमची बैठक झाली तेव्हा, ‘आता खूप झाले,’ हे संरक्षणमंत्र्यांचे उद्गार होते. आता मोठी कारवाई केली पाहिजे, यावर तिन्ही दलांच्या प्रमुखांचे एकमत झाले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, भारतीय सैन्यदलांना कारवाईची पूर्ण मोकळीक देण्यात आली होती. कारवाई करायचे पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला देण्यात आले होते. आम्हाला काय करायचे आहे, ते आमच्यावर सोडण्यात आले. या प्रकारचा आत्मविश्वास, राजकीय दिशा आणि राजकीय स्पष्टता आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो,” असेही लष्करप्रमुखांनी ४ ऑगस्ट रोजीच्या भाषणात सांगितले होते. या भाषणाचा व्हिडीओ रविवारी जनतेसमोर आला.

“५ एप्रिल रोजी आम्ही उत्तर कमांडवर गेलो. तिथे आम्ही विचार करून एक योजना आखली. तसेच तिची अंमलबजावणी करण्याची पूर्वतयारी केली. नंतर राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आम्ही दहशतवाद्यांचे नऊ पैकी ७ अड्डे नष्ट केले. तसेच दहशतवाद्यांचाही मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात यश मिळवले. हा कसोटी सामना चार दिवसांत संपला, पण हे युद्ध १४, १४० किंवा १४०० दिवसही लढले गेले असते. आम्हाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. पण आम्हाला प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे लागले. सैन्य प्रत्येक आघाडीवर तयार होते. आम्हाला नेहमीच प्रत्येक आघाडीवर तयार राहावे लागते,” असेही द्विवेदी म्हणाले.

“ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फिल्ड मार्शल म्हणून बढती दिली दिल्याबद्दल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, “जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की, तुम्ही हरला की जिंकला? तर ते म्हणतील आमचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल बनले आहेत. याचा अर्थ आम्ही नक्कीच जिंकलो असू.

बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे चाली रचल्या

ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे खेळत होतो. शत्रूची पुढची चाल काय असेल आणि त्यावर आम्ही काय चाल खेळणार, हे आम्हाला माहीत नव्हते. याला ‘ग्रे झोन’ असे म्हणतात. याचा अर्थ आम्ही पारंपरिक युद्ध लढत नव्हतो. तर आम्ही आधी सांगितलेली रणनीती अवलंबली होती. आम्ही एखादी चाल खेळायचो. मग शत्रूही एखादी चाल खेळायचा. कधी आम्ही त्याला चेकमेट करत होतो, तर कधी जीव धोक्यात घालून वार करत होतो. यालाच जीवन म्हणतात, असेही द्विवेदी यांनी सांगितले.

आम्ही धर्म विचारून नव्हे तर कर्म पाहून मारले - राजनाथ

“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारले होते, पण भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही. त्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले, पण आम्ही त्यांचा धर्म विचारून नाही, तर कर्म पाहून मारले,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशमधील एका कार्यक्रमात सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in