

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येत्या १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्याचा विचार करत आहे. यानुसार प्रवाशांना टोल भरण्यासाठी फक्त डिजिटल पद्धतींचा ‘फास्टॅग’, ‘यूपीआय’चा वापर करावा लागेल.
प्राधिकरणाने म्हटले की, अंमलबजावणीनंतर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल देयके केवळ डिजिटल माध्यमांतूनच स्वीकारली जातील. देशभरातील सर्व टोल नाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून संपूर्णपणे डिजिटल टोलिंग प्रणाली विकसित करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.
इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीत झालेल्या प्रगतीला अधिक बळ देणे आणि टोल नाक्यांच्या कार्यपद्धतीत कार्यक्षमता व विश्वासार्हता वाढवणे, हा या प्रस्तावित निर्णयामागील उद्देश असल्याचे स्पष्ट केले. या बदलामुळे वाहनचालकांसाठी ‘ईज ऑफ कम्युटिंग’ सुधारेल, लेनमधील वाहनांची गती वाढेल, टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल तसेच व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुसंगतता येईल.
गेल्या काही वर्षांत ‘फास्टॅग’ चा वापर ९८ टक्क्यांहून अधिक वाहनांपर्यंत पोहोचला असून त्यामुळे देशातील टोल वसुली पद्धतीत मोठा बदल झाला आहे. सध्या बहुतांश टोल व्यवहार टोल नाक्यांवर ‘यूपीआय’द्वारे आणि सुलभ डिजिटल देयकाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार, वैध व कार्यरत ‘फास्टॅग’ नसलेल्या वाहनांना टोल नाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट शुल्क आकारले जाते, तर ‘यूपीआय’द्वारे देयक करणाऱ्या वाहनचालकांकडून संबंधित वाहन श्रेणीसाठी लागू असलेल्या शुल्काच्या १.२५ पट रक्कम आकारली जाते. राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गांवरील १,१५० हून टोल नाक्यांवर डिजिटल देयक प्रणाली लागू झाल्यास कार्यक्षमता वाढेल.