नवी दिल्ली : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली. शोएब अहमद मिर्झा उर्फ छोटू असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात आजवर एकूण पाच जणांना अटक झाली आहे.
रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपास केल्यानंतर तीन दिवसांनी एनआयएने शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली. कर्नाटकातील हुब्बळी शहरातील रहिवासी असलेला ३५ वर्षीय शोएब अहमद मिर्झा उर्फ छोटू याला यापूर्वी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी कट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते, असे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर मिर्झा या नव्या कटात सामील झाल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. त्याने २०१८ मध्ये आरोपी अब्दुल मतीन ताहाबरोबर मैत्री केली. तो त्याचा हँडलर होता, असे तपास संस्थेने म्हटले आहे. मिर्झाने पुढे अब्दुल मतीन ताहा याच्याबरोबर सांकेतिक संवादासाठी एक ई-मेल आयडी दिला केला होता. त्याला १२ एप्रिल रोजी कोलकाता येथून सह-आरोपी मुसावीर हुसेन शाजीबसह अटक करण्यात आली होती.
देशात २९ ठिकाणी व्यापक शोध
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेत १ मार्च २०२४ रोजी झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान एनआयएने भारतभरात २९ ठिकाणी व्यापक शोध घेतला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात ११ आरोपींचा तपास केला गेला. या प्रकरणात आजवर ५ आरोपींना अटक झाली आहे. बंगळुरूमधील ब्रूकफिल्डच्या आयटीपीएल रोडवरील या कॅफेमध्ये इम्प्रुवाइज्ड एक्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) वापरून झालेल्या स्फोटात अनेक ग्राहक आणि कर्मचारी जखमी झाले होते.