इसिसच्या ४४ ठिकाणांवर एनआयएचे छापे महाराष्ट्र, कर्नाटकातून १५ जणांना अटक

एनआयएच्या अनेक पथकांनी शनिवारी पहाटे महाराष्ट्रातील भिवंडीनजीकच्या पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे आणि कर्नाटकातील बंगळुरू येथे तब्बल ४४ ठिकाणी छापे मारले.
इसिसच्या ४४ ठिकाणांवर एनआयएचे छापे महाराष्ट्र, कर्नाटकातून १५ जणांना अटक

नवी दिल्ली : आयएसआयएस (इसिस) या दहशतवादी संघटनेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी मोठी कारवाई केली. महाराष्ट्र व कर्नाटक येथून इसिसच्या १५ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात इसिस मॉड्युलचा एक म्होरक्याही समाविष्ट आहे. तो नव्याने भरती होणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्यांना निष्ठेची शपथ देत होता, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.

एनआयएच्या अनेक पथकांनी शनिवारी पहाटे महाराष्ट्रातील भिवंडीनजीकच्या पडघा-बोरिवली, ठाणे, मीरा रोड आणि पुणे आणि कर्नाटकातील बंगळुरू येथे तब्बल ४४ ठिकाणी छापे मारले. या कारवाईमध्ये दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित कृत्ये आणि त्यास प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली १५ आरोपींना अटक केली.

इसिसच्या म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इराक आणि सीरिया) च्या कारवायांना हाणून पाडण्यासाठी हे छापे घातले जात आहेत. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदुका, धारदार शस्त्रे, कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

एनआयए अधिकाऱ्याने सांगितले की, या कारवाईत पकडलेले आरोपी हे त्यांच्या परदेशी हँडलर्सच्या निर्देशानुसार काम करीत असून, आयएसआयएसचा हिंसक आणि विध्वंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी सुधारित स्फोटक उपकरणे तयार करण्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.

तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी इसिस महाराष्ट्र मॉड्युलचे सर्व सदस्य भिवंडी नजीकच्या पडघा-बोरिवली येथून काम करीत होते, तेथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता. ‘हिंसक जिहाद’ (पवित्र युद्ध), खिलाफत, इत्यादी मार्गाचा पाठपुरावा करून आरोपींनी देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, असे प्रवक्त्याने सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ग्रामीण ठाण्यातील पडघा गावाला "मुक्त क्षेत्र" आणि "अल शाम" म्हणून घोषित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ते प्रभावशाली मुस्लीम तरुणांना पडघा तळ मजबूत करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते, असे प्रवक्त्याने सांगितले. मुख्य आरोपी आणि इसिस मॉड्युलचा म्होरक्या साकिब नाचन, प्रतिबंधित संघटनेत सामील झालेल्या व्यक्तींना 'बयथ' (इसिसच्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देखील देत होता, अशी माहिती एनआयए अधिकाऱ्याने दिली.

११ जण भिवंडीतील

११ जण भिवंडीतून असल्याचे समोर आले आहे. एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गाव आणि भिवंडीतील निजामपुरा, इस्लामपुरा व तीन बत्ती परिसरात ९ डिसेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास छापेमारी करत 'इसिस' दहशतवादी संघटनेच्या संशयित ७ आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

साकीब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सुसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे, मुंझिर केपि, अशी अटक केलेल्या १५ आरोपींची नावे असून यापूर्वी एनआयएने यामधील ४ जणांना भिवंडीतील पडघा-बोरिवलीतून ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यामुळे आता भिवंडीतून एनआयएने कारवाई केलेल्या दहशतवादी संघटनेच्या संशयितांची संख्या अकरावर पोहचली आहे.

अशी होती दहशतवादी कामाची पद्धत

अटक सर्वजण दहशतवादी कृत्यांसाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसच्या बनावट, प्रशिक्षण आणि बॉम्ब बनवून त्याची चाचणी करत असल्याचे समोर आले. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या आरोपींपैकी शमील साकीब नाचन हा अकिब नाचन, झुल्फीकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादीर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. यापूर्वी अटक केलेला अकिब हा शरजील शेख आणि झुल्फीकार अली बडोदावाला या दोघांना भाड्याच्या खोलीत भाड्याने देऊन त्यांना आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in