देशात आयआयटी-मद्रास अव्वल; सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबईला तिसरे स्थान

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना (एनआयआरएफ) २०२५ यादीवर पुन्हा एकदा आयआयटी मद्रासने आपली मोहोर उमटवली आहे.
देशात आयआयटी-मद्रास अव्वल; सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबईला तिसरे स्थान
Published on

मुंबई : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना (एनआयआरएफ) २०२५ यादीवर पुन्हा एकदा आयआयटी मद्रासने आपली मोहोर उमटवली आहे. सर्व शैक्षणिक संस्था व अभियांत्रिकी या दोन गटांमध्ये आयआयटी मद्रासने अव्वल कामगिरी केली आहे, तर एम्स दिल्ली, जेएनयू, आयआयएससी बंगळुरूसह विविध आयआयटी संस्थांनी पहिल्या १० क्रमांकांवर वर्चस्व कायम ठेवले आहे. तसेच आयआयटी मुंबईने सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसरे स्थान कायम ठेवले आहे.

देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय २०१६ पासून दरवर्षी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी रचना यादी जाहीर करते. त्यानुसार शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी एनआयआरएफ क्रमवारीची १० वी आवृत्ती जाहीर केली. यामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून सलग सात वर्ष आयआयटी मद्रासने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर अभियांत्रिकी क्रमवारीत सलग १० वर्ष अव्वल स्थानावर आहे. आयआयटी मद्रासने शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, नवोन्मेष आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळुरूला २०२५ साठी देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले. आयआयएससी बंगळुरूने सलग दहाव्या वर्षी यामध्ये आपले स्थान कायम राखण्यात यश मिळिवले आहे. विद्यापीठ क्रमवारीमध्ये आयआयएससी बंगळुरूनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि मणिपाल ॲकॅडमी या संस्थांनी बाजी मारली आहे. वैद्यकीय क्षेत्रात दिल्ली येथील एम्स रुग्णालय पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे.

राज्यातील शैक्षणिक संस्थांची घसरण

एनआयआरएफ क्रमवारीमध्ये यंदाही राज्यातील ११ शैक्षणिक संस्थांनी सर्वोत्तम संस्थांच्या यादीत पहिल्या १०० क्रमवारीमध्ये स्थान मिळवले आहे. मात्र गतवर्षीच्या क्रमवारीच्या तुलनेत यंदा संस्थांची मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील आयआयटी मुंबई, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील सिम्बॉयसिस वगळता अन्य आठ संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

१७ श्रेणींमध्ये क्रमवारी जाहीर

एनआयआरएफ २०२५ क्रमवारीमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली आणि प्रादेशिक भाषांचा अवलंब करण्याबरोबरच वैविध्यपूर्ण उच्च शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या १७ श्रेणींमध्ये क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, दंत, कायदा, वास्तुकला आणि नियोजन, कृषी आणि संबंधित क्षेत्रे, मुक्त विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठे यांचा समावेश आहे.

आयआयएम मुंबई व्यवस्थापन श्रेणीत सहाव्या स्थानावर

आयआयएम मुंबईने व्यवस्थापन क्रमवारीमध्ये सहावे स्थान मिळवले आहे. क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर येण्याचा आनंद असून, ही कामगिरी आमच्या प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्या समर्पणाचे प्रतिबिंब असल्याचे आयआयएमचे प्रा. मनोज तिवारी यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाची क्रमवारीत सुधारणा

मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशातील सर्वोत्तम १०० शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत गतवर्षी १३२ व्या स्थानावर असलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा ९२ वे स्थान पटकावले आहे, तर विद्यापीठ श्रेणीमध्ये ६१ व्या स्थानावरून ५४ व्या स्थानी आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in