श्रीहरिकोटा : ‘नासा’ व ‘इस्रो’ने संयुक्तपणे तयार केलेला सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘निसार’ (NISAR) बुधवारी यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी ५:४० वाजता ‘जीएसएलव्ही-एफ१६’ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले.
‘निसार’ उपग्रह २,३९३ किलोग्रॅम वजनाचा असून तो अवकाशात नियोजित कक्षात स्थापित करण्यात आल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. हा उपग्रह ७४३ किमी उंचीवर, ९८.४ अंश कललेल्या सूर्य-समकालिक कक्षेत स्थापित करण्यात आला. ‘निसार’ ७४७ किमी उंचीवर असलेल्या ध्रुवीय कक्षेत फिरेल. ध्रुवीय कक्षा म्हणजे अशी कक्षा ज्यामध्ये उपग्रह पृथ्वीच्या ध्रुवांवरून जातो. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
‘निसार’ हा एक उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपग्रह असून त्याचे पूर्ण नाव ‘नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार’ आहे. या मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२,५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. १२ दिवसांत १,१७३ प्रदक्षिणा पूर्ण करून, तो पृथ्वीच्या जमिनीच्या जवळजवळ प्रत्येक इंचाचा नकाशा तयार करेल.
‘निसार’ उपग्रहाची वैशिष्ट्ये
‘निसार’ उपग्रहात ढग, घनदाट जंगले, धूर आणि अंधारातही पाहण्याची क्षमता आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अगदी लहान बदलदेखील तो पाहू शकतो.
पारंपारिक उपग्रहांचा वापर करून पृथ्वीवर होत असलेल्या जलद बदलांचा अचूक मागोवा घेता येत नाही. ‘निसार’ ही उणीव भरून काढेल. ते सर्व हवामान परिस्थितीत उच्च दर्जाचे फोटो काढणार असून, ते पृथ्वीच्या प्रत्येक लहान-मोठ्या हालचाली दाखवेल.