नितीश कुमार एनडीएच्या दिशेने? बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या

नितीश कुमार यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने बिहारचे राजकीय वातावरण आता तापले आहे
नितीश कुमार एनडीएच्या दिशेने? बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या

पाटणा : बिहारमध्ये युतीचे सरकार चालवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षांमध्ये राजकीय तणाव सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंगळवारी अचानक राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले. या भेटीवेळी नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय चौधरी हेदेखील होते. नितीश कुमार मंगळवारी सकाळी एका शासकीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र तिथून ते थेट राजभवानावर गेले. राज्यपालांसोबत त्यांची तब्बल ४० मिनिटे बैठक झाली. विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत नितीश कुमार आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. मात्र नितीशकुमार यांच्या राज्यपालांच्या भेटीमुळे नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून एनडीएची कास धरणार का, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

नितीश कुमार यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने बिहारचे राजकीय वातावरण आता तापले आहे. कारण मागील काही महिन्यांपासून नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका विधानाने याबाबतच्या चर्चांमध्ये आणखीनच भर टाकली. जेडीयू पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकते का, असा प्रश्न एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमित शहा यांनी प्रस्ताव आल्यास विचार करू, असे म्हणत त्यांच्याकडून सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. देशभरातील विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीत आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल, अशी सुरुवातीपासून नितीश कुमार यांची अपेक्षा होती. मात्र इंडिया आघाडीच्या अनेक बैठका झाल्यानंतरही याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. तसेच नितीश कुमार यांनी मांडलेल्या इतर भूमिकांनाही काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज झालेले नितीश कुमार पुन्हा एकदा वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in