देशातील रस्त्यांसाठी ८ लाख कोटींची उभारणी करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्र सरकार देशातील रस्ते प्रकल्पांसाठी दरवर्षी ८ लाख कोटी रुपये निधी उभारणी करू शकते, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. बीएसई येथे एनएचएआय पुरस्कृत ‘राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’च्या नोंदणी सोहळ्यात ते बोलत होते.
देशातील रस्त्यांसाठी ८ लाख कोटींची उभारणी करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
देशातील रस्त्यांसाठी ८ लाख कोटींची उभारणी करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
Published on

मुंबई : केंद्र सरकार देशातील रस्ते प्रकल्पांसाठी दरवर्षी ८ लाख कोटी रुपये निधी उभारणी करू शकते, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. बीएसई येथे एनएचएआय पुरस्कृत ‘राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’च्या नोंदणी सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले की, आमची खरी समस्या आपण खर्च करू शकत नाही ही आहे. आपल्या खर्चाचा वेग खूपच कमी आहे. महामार्ग निर्मितीला सामाजिक-आर्थिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व असून, अधिक खर्चामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकते. पायाभूत सुविधांवर खर्च केलेला प्रत्येक १ रुपया ३ रुपयांच्या आर्थिक उलाढालीला चालना देतो, असे त्यांनी सांगितले.

महामार्ग क्षेत्रातील भक्कम मालमत्तेच्या जोरावर सरकार बाजारातून दरवर्षी ५ लाख कोटी रुपये उभे करू शकते, शिवाय ३.२ लाख कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय सहाय्य उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई व देशाची तंत्रज्ञान राजधानी असलेली बेंगळुरू यांच्यातील अंतर कमी करण्याचे सरकारने ठरवले आहे. मुंबई-बेंगळुरू नवीन एक्सप्रेस हायवे बांधण्याची योजना सुरू आहे. यामुळे मुंबई आणि बंगळुरूमधील प्रवासाचा वेळ सध्या २४ तासांवरून केवळ पाच तासांवर येईल, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

द्वारका एक्स्प्रेसजवळ ८ लाख कोटींची गुंतवणूक

दिल्लीजवळील द्वारका एक्स्प्रेस-वे प्रकल्पाच्या ठिकाणी पूर्वी जंगल होते. तेथील जमिनीला भाग नव्हता. आता त्या भागात रिअल्टी गुंतवणुकीत ८ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत गडकरी म्हणाले की, भूसंपादनासह इतर समस्यांमुळे २०१० मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला विलंब झाला. मात्र, ९३ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यांत बांधकाम पूर्ण होईल. १० एप्रिल रोजी ते स्वतः या कामाची पाहणी करणार आहेत.

पुणे आणि मुंबईसाठी महत्त्वाचे प्रकल्प

येत्या पंधरवड्यात पुणे आणि आसपासच्या भागात ४० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाईल. यामध्ये पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस-वेसह इतर चार प्रकल्पांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in