नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जवळपास दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, पक्षाला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपने रविवारी बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या या निर्णयाची माहिती राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांनी रविवारी दिली. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनणारे नितीन नबीन (४५) हे सर्वात तरुण आणि पहिले नेते ठरले आहेत. नितीन नबीन यांची सध्या भाजपच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असली तरी नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत तेच पक्षाचे ‘कप्तान’ असतील.
भाजपच्या नेहमीच्या राजकीय धक्कातंत्रानुसार भाजपने रविवारी आणखी एक धक्का दिला. देशभरात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना भाजपच्या संसदीय मंडळाने ४५ वर्षांच्या नितीन नबीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यामुळे आता भाजपला नवा पूर्णवेळ अध्यक्ष मिळेपर्यंत नितीन नबीन हे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्याची परंपरा भाजपमध्ये आहे, जी एक महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान, सुनील बन्सल, धर्मेंद्र प्रधान, रघुवर दास, वनती श्रीनिवासन, तमिळीसाई सौंदर्यराजन, डी. पुरंदेश्वरी ही नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपमध्ये अनेकदा कार्यकारी अध्यक्षच पुढे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे नबीन यांच्याकडे भाजपचे भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे.
नितीन नबीन हे सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारमध्ये रस्ते निर्माणमंत्री आहेत. नितीन नबीन हे भाजपचे वरिष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून वडिलांच्या निधनानंतर तेच त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून नितीन नबीन निवडून आले आहेत.
संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, पक्षातील दीर्घकाळची वाटचाल आणि प्रशासनावरील मजबूत पकड या बाबी लक्षात घेऊन पक्षनेतृत्वाने त्यांची निवड केली आहे. विद्यार्थी राजकारणापासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांनी केली असून, भाजपमध्ये विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे. युवा मोर्चा, सरकारमध्ये मंत्री ते आता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. अत्यंत शिस्तप्रिय, रणनीती आणि लोकांशी दांडगा संपर्क असलेला नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.
शक्तिशाली नेता ते कार्यकारी अध्यक्ष
नितीन नबीन हे माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला होता आणि ते विद्यार्थीदशेपासूनच त्यात सहभागी आहेत. पाटणा येथे जन्मलेले नितीन नबीन हे राजकारणात येण्यापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रिय होते. जिथे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची ओळख पटली. वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी २००६ मध्ये पोटनिवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ मध्ये सलग विधानसभा निवडणुका जिंकल्या. २०२० च्या निवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाला पराभूत केले. २०२५च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९८,२९९ मते मिळवत त्यांनी राजद उमेदवार रेखा कुमारी यांचा ५१,९३६ मतांनी पराभव केला. हा त्यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जातो.
भाजपला यशाच्या नवीन उंचीवर नेतील - राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नितीन नबीन यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. “बिहारमधील तरुण आणि उत्साही नेते नितीन नबीन यांचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. कष्टकरी कार्यकर्ते आणि उत्तम कल्पनाशक्ती असलेले व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली ते भाजपला यशाच्या नवीन उंचीवर नेण्यात नक्कीच यशस्वी होतील. यशस्वी कार्यकाळासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी केंद्रीय नेतृत्वाचा आभारी आहे. हे पद माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन व नेतृत्वामुळे पुढे जाऊ.
नितीन नबीन, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
समृद्ध संघटनात्मक अनुभव - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. नितीन नबीन यांनी स्वतःला एक मेहनती भाजप कार्यकर्ता म्हणून स्थापित केले आहे. ते एक तरुण, समर्पित आणि संघटनात्मकदृष्ट्या अनुभवी नेते आहेत. ज्यांचा बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून अनेक कार्यकाळात प्रभावी कामगिरी आहे. त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि वचनबद्धतेने काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.