"ऐसा कोई सगा नहीं, जिसे नितीशने ठगा नही"; नितीश कुमार जेडीयूचे पुन्हा अध्यक्ष होताच बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीका

गेल्या अनेक दिवसांपासून ललन सिंह यांचे अध्यपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
"ऐसा कोई सगा नहीं, जिसे नितीशने ठगा नही"; नितीश कुमार जेडीयूचे पुन्हा अध्यक्ष होताच बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची टीका

संयुक्त जनता दल (JDU) पक्षाच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या महत्वपूर्ण बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पुन्हा जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ललन सिंह यांचे अध्यक्षपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

ललन सिंह यांनी या बैठकीत आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर नितीश कुमार यांना अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती जेडीयूचे सरचिटणीस राम कुमार शर्मा यांनी दिली आहे.

मी लोकसभा निवडणूक लढवणार असून या निडवणुकीत मी व्यग्र राहणार असल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे ललन सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितले. त्यानंतर आम्ही नितीश कुमार यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव ठेवला, असे बिहारचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले.

ऐसा कोई सगा नहीं, जिसे नितीशने ठगा नही - जीतनराम मांझी

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नेतृत्व बदलानंतर नितीश कुमार यांच्यावर टीका केली."नितीश कुमार यांनी तीन वर्षीय योजनेअंतर्गत ललन सिंह यांचा देखील पत्ता कट केला. जे नितीश कुमार फर्नांडिस साहेबांचे नाही झाले, RCP बाबू, शरद यादव, दिग्विजय सिंह यांचे नाही झाले. ते त्यांचे कसे होणार? हे ललन बाबू यांना कळायला हवे होते.", अशी पोस्ट 'एक्स'वर करत, "ऐसा कोई सगा नहीं, जिसे नितीशने ठगा नही", असा खोचक टोला लगावला.

'देश का प्रधानमंत्री कैसा हो'-

दरम्यान, नितीश कुमार यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेला अध्यक्षपदाचा ठराव स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पक्षकार्यालयाबाहेर आनंद साजरा केला. या वेळी "देश का प्रधानमंत्री कैसा हो , नितीश कुमार जैसा हो!", अशा घोषणा देखील कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

यापूर्वी, ललन सिंह यांचे अध्यक्षपद जाण्याच्या चर्चा सुरु असताना राजद नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या अफवा असल्याचे म्हटले होते.

logo
marathi.freepressjournal.in