पाटणा : तब्बल दोन दशके बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे जदयूचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी राज्याच्या राजकारणाला रामराम करीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, जदयूच्या कार्यकर्त्यांना नितीश कुमार यांचा निर्णय पटलेला नाही. नितीश कुमार यांच्या निर्णयाने कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी कार्यालयात टेबल आणि प्लेट्सची तोडफोड करीत आपला निषेध व्यक्त केला.
नितीश कुमार अर्ज भरणार असल्याने शहा दिल्लीहून पाटण्याला आले होते. शहांच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कट कारस्थानांनी सत्ता मिळवली जाऊ शकत नाही, मतदारांनी २०२५ ते २०३० साठी नितीश यांच्याकडे पाहून मतदान केले होते. मग नितीश कुमार यांना मध्येच का हटवले जात आहे, असा सवाल काही कार्यकर्त्यांनी विचारला. आम्ही निशांतकुमार यांना पक्षात सक्रिय करण्याची मागणी करत होतो. पण आम्हाला मुख्यमंत्रिपदी नितीशच हवे होते. आता भाजपने मध्येच गेम केला आहे. आम्ही तो कदापि सहन करणार नाही. बिहारी जनता याचे उत्तर लवकरच देईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
निशांत कुमार उपमुख्यमंत्री?
नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनाही वरच्या सभागृहात पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तसे न घडल्यास निशांत कुमार यांची बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदावर निवड होऊ शकते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.